( पुरी / वृत्तसंस्था )
ओडिशातील पुरी येथे भगवान जगन्नाथांच्या भव्य आणि ऐतिहासिक रथयात्रेला गुरुवारी पारंपरिक विधींसह उत्साहात सुरुवात झाली. भारतासह जगभरातून लाखो भाविक भगवान जगन्नाथांचे दर्शन घेण्यासाठी पुरीत दाखल झाले आहेत. मात्र या धार्मिक सोहळ्याला दुर्दैवाची किनार लाभली असून, प्रचंड गर्दीमुळे ‘बडादंड’ परिसरात चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती निर्माण झाली. या घटनेत दोन भाविकांचा मृत्यू झाला असून, सुमारे 150 हून अधिक जणांना विविध आरोग्यविषयक तक्रारींमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लाखो भाविकांनी मुसळधार पावसाची पर्वा न करता श्री जगन्नाथ मंदिराला गुंडीचा मंदिराशी जोडणाऱ्या ३ किलोमीटर लांबीच्या बडाडंडा रस्त्यावर गर्दी केली होती. गर्दीच्या वेळी दोन भाविक अचानक बेशुद्ध पडले. त्यांना तातडीने पुरी जिल्हा मुख्यालय रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. मृतांपैकी एकाची ओळख अद्याप पटलेली नसून, एकाची ओळख अनिल डॅश (३५) अशी पटली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
मरीचिकोटे चौकाजवळ गर्दीतून जाणाऱ्या रुग्णवाहिकेला मार्ग देण्यासाठी भाविकांना बाजूला ढकलण्यात आल्याने चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली. या प्रचंड गर्दीत अनेक जण एकमेकांवर पडले, ज्यामुळे ते जखमी झाले.
पहाटेपासून धार्मिक विधींना प्रारंभ
संततधार पावसात आणि लाखो भक्तांच्या उपस्थितीत पहाटेपासून पारंपरिक ‘पहंडी’ विधीला सुरुवात झाली. भगवान जगन्नाथांचा ‘नंदी घोष’, भगवान बलभद्रांचा ‘तालध्वज’ आणि देवी सुभद्रेचा ‘दर्पदलन’ हे तीन भव्य रथ सज्ज करण्यात आले. घंटानाद, शंखध्वनी, झांज आणि गोंग यांच्या गजरात श्रीमंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला. भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा यांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
‘जय जगन्नाथ’च्या घोषणांनी दुमदुमला रथमार्ग
पंडित सूर्यनारायण रथशर्मा यांनी सांगितले की, श्री सुदर्शन हे भगवान विष्णूंचे दिव्य शस्त्र असून त्यांची पुरीमध्ये भगवान जगन्नाथ म्हणून पूजा केली जाते. सेवकांनी पारंपरिक पद्धतीने भगवान बलभद्र, देवी सुभद्रा आणि भगवान जगन्नाथ यांच्या मूर्ती रथांवर विराजमान केल्या. भगवान जगन्नाथांची मूर्ती मंदिरातून बाहेर येताच संपूर्ण रथमार्गावर “जय जगन्नाथ”च्या घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले. लाखो भाविकांनी हात उंचावून प्रभूंचे दर्शन घेत आनंदोत्सव साजरा केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून शुभेच्छा
रथयात्रेनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना शुभेच्छा दिल्या. त्यांनी सोशल मीडियावर संदेश देताना म्हटले की, “रथयात्रा ही भारताच्या समृद्ध आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारशाचे प्रतीक आहे. ही परंपरा नम्रता, सामूहिक सहभाग आणि निःस्वार्थ सेवेचा संदेश देते. भगवान जगन्नाथ सर्वांना उत्तम आरोग्य, सुख, समृद्धी आणि समाजात अधिक एकतेची भावना प्रदान करो. जय जगन्नाथ!”

