(कळझोंडी / वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील वाटद, कळझोंडी, कोळीसरे, गडनरळ,वैद्यलावगण इत्यादी गावांमध्ये गणरायांचे आगमन झाले असून या गणरायांच्या गीत गायनांमधून एकच जिद्द वाटद- एमआयडीसी रद्द ! अशी क्रांतिकारी घोषणा घुमू लागली आहे. या माध्यमातून एमआयडीसी विरोधात प्रचंड जनजागृती केली जात असून या भागातील कार्यकर्त्यांनी आपल्या प्रत्येकाच्या घरी याबाबत फलक लावून जनजागृती केली जात आहे.
वाटद एम.आय.डी.सी विरोधी संघर्ष कृती समितीच्या वतीने प्रमुख युवक नेते प्रथमेश गावणकर यांचे मार्गदर्शनाखाली विविध वाडी वस्तीत संघर्ष कृती समितीचे कार्यकर्ते अतिशय उत्तम प्रकारे नियोजन करुन गावात, विविध सार्वजनिक रहदारी असलेल्या ठिकाणी व वाडी वस्तीत घराघरात वाटद एम.आय.डी.सी.रद्द व्हावी यासाठी फलक लावण्यात आले आहेत. शिवाय गणेशांच्या या आगमनाची गीत गायनांमधून वाटद एमआयडीसी विरोधात जनजागृती करणारी सुमधूर गाणी स्थानिक कवी, गायक मोठ्या भक्तिभावाने गात आहेत.
गणपती बाप्पा मोरया -पुढच्यावर्षी लवकर या!एम.आय.डी.सी.ला – घेऊन जा, अशा गगनभेदी घोषणांनी परिसर दणाणून सोडत आहेत. वृत्तपत्रात खोट्या बातम्या जाणूनबुजून प्रसिद्ध करण्यात आल्या असल्याने येथील ग्रामस्थांमध्ये प्रचंड संतापाची लाट पसरली आहे. लोकशाहीच्या सनदशीर मार्गाने वाटद एमआयडीसी या विनाशकारी प्रकल्पा विरोधात वाटद एमआयडीसी विरोधी संघर्ष कृती समितीच्या वतीने जाहीर सभा घेऊन जनसंवाद, जनजागृती साधली जात आहे. या जनजागृती आंदोलनाला मोठ्या संख्येने स्थानिक व मुंबईस्थित नागरिकांचा पाठींबा मिळत आहे. याबाबत संघर्ष कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व तमाम शेतकरी, कष्टकरी, कामगार, स्थानिक जमीन मालकांनी समाधान व्यक्त केले आहे. गणेशभक्तांनी या विनाशकारी प्रकल्पाचे संकट टळावे, यासाठी श्री गणरायाला गाऱ्हाणे घातले आहे.
सन २०२५ या वर्षी गणपती उत्सवाच्या निमित्ताने स्थानिक कवी, गायक शाहीर बुवा यांना विनाशकारी प्रकल्प व्हावे नष्ट अन्
निसर्गरम्य कोकण व्हावे आपले पर्यटन !! अशा विविधांगी गीते लिहिण्याची व जनजागृती करण्याची संधी प्राप्त झाली आहे. नवीन संदेश वाचा-पर्यावरण वाचवा!! असा संदेश देत गणेश मंडळे श्री गणरायाला वंदन करताना दिसत आहेत.