(ठाणे / वृत्तसंस्था)
भिवंडी शहरात शोरमामधून विषबाधा होण्याची घटना पुन्हा समोर आली असून, बाधित रुग्णांची संख्या वाढून ३४ वर पोहोचली आहे. वंजारपट्टी नाका परिसरातील ए.के. शोरमा दुकानातून शोरमा खाल्ल्यानंतर नागरिकांना उलटी, जुलाब, मळमळ आणि तापाचा त्रास सुरू झाला. या रुग्णांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. सर्व बाधितांना उपचारासाठी भिवंडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, रुग्णांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या घटनेची माहिती मिळताच भिवंडी महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त गिरीश गोष्टेकर, बीट निरीक्षक हनुमान म्हात्रे, आरोग्य अधिकारी फैसल तातली, महापालिकेचे आरोग्य पथक, निजामपूर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन महापालिकेने संबंधित ए.के. शोरमा दुकानावर तोडक कारवाई केली असून, शोरमाची टपरी जप्त केली आहे. दुसरीकडे, निजामपूर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
भिवंडी महापालिकेचे सहाय्यक आयुक्त गिरीश गोष्टेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, वंजारपट्टी नाका येथील वॉर्ड क्रमांक १ मध्ये शोरमा खाल्ल्याने अनेकांना विषबाधा झाल्याची माहिती मिळाल्यानंतर अतिक्रमण विभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांकडून पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू होती. अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारीही घटनास्थळी येऊन आवश्यक कारवाई करतील, असे त्यांनी सांगितले. दोन महिन्यांपूर्वी १०७ जणांना विषबाधा झाल्याच्या घटनेनंतरही कारवाई करण्यात आली होती. मात्र, वंजारपट्टी नाका येथील घटनेत बाधितांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता असल्याचे गोष्टेकर यांनी स्पष्ट केले.
भिवंडी उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. आकाश शुक्ला यांनी दिलेल्या माहितीनुसार, एकाच कुटुंबातील चार रुग्ण उपचारासाठी दाखल झाले होते. त्यांनी आदल्या दिवशी शोरमा खाल्ल्याचे सांगितले. तसेच त्यांच्यासोबत आणखी काही लोकांनीही शोरमा खाल्ल्याची माहिती दिली होती. सध्या रुग्णांची प्रकृती सामान्य असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे डॉ. शुक्ला यांनी सांगितले.
दरम्यान, भिवंडीत अशा प्रकारची विषबाधेची घटना पहिल्यांदाच घडलेली नाही. जून महिन्यात खंडू पाडा परिसरातील फेमस शोरमा दुकानातून शोरमा आणि पिझ्झा खाल्ल्याने तब्बल १०७ जणांना विषबाधा झाली होती. त्यानंतर आता वंजारपट्टी नाका परिसरात पुन्हा अशी घटना घडल्याने उघड्यावर अन्नपदार्थांची विक्री करणाऱ्या व्यावसायिकांच्या तपासणीचा आणि नियंत्रणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वारंवार घडणाऱ्या या घटनांना आळा घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासन आणि भिवंडी महानगरपालिका शोरमा, पिझ्झा विक्री करणाऱ्या दुकानांसह उघड्यावर अन्नविक्री करणाऱ्यांविरोधात कोणती ठोस पावले उचलणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दरम्यान, राज्यभरात अन्न व औषध प्रशासनाकडून (एफडीए) हॉटेल्स आणि खाणावळींमध्ये प्रत्यक्ष तपासणी मोहीम राबवली जात आहे. अन्न सुरक्षा नियमांचे पालन केले जात आहे की नाही, याची अधिकाऱ्यांकडून नियमित पडताळणी करण्यात येत आहे. या मोहिमेदरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अनेक हॉटेल्स आणि आस्थापनांचे अन्न सुरक्षा परवाने निलंबित करण्यात आले आहेत. असे असतानाही भिवंडीत शोरमा खाल्ल्यानंतर विषबाधेची घटना घडल्याने अन्नपदार्थांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अलीकडेच यासंदर्भात कठोर भूमिका स्पष्ट केली होती. अन्न सुरक्षा परवाना निलंबित करूनही अशा घटना थांबत नसतील, तर संबंधित आस्थापनांचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याची कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला होता. सध्या राज्यभरात एफडीएकडून नियमभंग करणाऱ्या आस्थापनांविरोधात कडक कारवाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर भिवंडीतील विषबाधा प्रकरणाची प्रशासनाकडून कशा प्रकारे दखल घेतली जाते आणि पुढे कोणती कारवाई केली जाते, याकडे लक्ष लागले आहे.


