(पुणे/मुंबई)
गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने महाराष्ट्राला झोडपून काढले आहे. शेतकरी संकटात सापडले असून नद्यांना आलेल्या पुरामुळे परिस्थिती आणखी गंभीर बनली आहे. अशा वेळी हवामान विभागाने पुन्हा एकदा राज्यात पावसाचा इशारा दिला आहे. पुढील चार दिवसांसाठी हाय अलर्ट जारी करण्यात आला असून २६ ते २९ सप्टेंबरदरम्यान मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मुंबई शहर आणि उपनगरात सामान्यतः ढगाळ आकाशासह तुरळक ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे. तर कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या तीनही जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या पाचही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह आणि मेघगर्जनेसह जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. या पाचही जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.
२७ सप्टेंबरला अतिमुसळधार पावसाचा इशारा
हवामान खात्याच्या अंदाजानुसार २७ सप्टेंबर रोजी राज्यभरात विशेषतः मराठवाड्यात अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो. विदर्भालाही याचा फटका बसण्याची शक्यता आहे. दरम्यान, बंगालच्या उपसागरात निर्माण होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. मच्छीमार बांधवांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.
पावसामुळे भीषण नुकसान
राज्यात अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली असून शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. मराठवाड्यात उभी पिके पाण्याखाली गेली आहेत. अनेक गावांचा संपर्क तुटल्याने नागरिक अडचणीत सापडले आहेत. त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम सुरू आहे. पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूरग्रस्त भागांना भेट देऊन नुकसानीची माहिती घेतली.

