(पालघर)
नालासोपारा पूर्वेकडील मोरेगाव येथे घडलेल्या धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडवून दिली आहे. मित्राच्या मैत्रिणीला इन्स्टाग्रामवर अश्लील संदेश पाठवल्याच्या रागातून मित्रांनीच एका तरुणाला बेदम मारहाण केली. या मारहाणीत प्रतीक वाघे (वय २४) याचा मृत्यू झाला असून पोलिसांनी सात आरोपींना अटक केली आहे.
प्रतीक वाघे आणि या प्रकरणातील मुख्य आरोपी भूषण पाटील हे मागील तीन वर्षांपासून मित्र होते. दोघेही पूर्वी मिरारोड येथील भक्तिवेदांत हॉस्पिटलमध्ये वॉर्ड बॉय म्हणून काम करत होते. सध्या प्रतीक तिथेच कार्यरत होता, तर भूषणने दोन वर्षांपूर्वी नोकरी सोडली होती. दरम्यान, प्रतीकने भूषणच्या मैत्रिणीला इन्स्टाग्रामवर अश्लील संदेश पाठवले होते. याची माहिती भूषणला समजली होती, या प्रकाराचा त्याच्या मनात होता.
२४ ऑगस्टच्या रात्री भूषणने प्रतीकला मोरेगाव येथे बोलावले. त्यावेळी भूषणने आपल्या काही मित्रांच्या मदतीने प्रतीकवर भीषण हल्ला चढवला. आरोपींनी त्याला बेदम मारहाण केली आणि याचा व्हिडिओ स्वतः काढून सोशल मीडियावर टाकला.
रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू
हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या प्रतीकला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तुळींज पोलिसांनी या प्रकरणी गैरकायद्याची मंडळी जमवून हत्या केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत मुख्य आरोपी भूषण पाटील, संकेत पाटील, स्वरूप मेहेर यांच्यासह एकूण सात जणांना अटक केली आहे.
सोशल मीडियावरील वादाचे रूपांतर एका गंभीर गुन्ह्यात होऊन एका तरुणाचा जीव गेला आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून तुळींज पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

