(गुहागर)
गुहागर येथे शिक्षक म्हणून कार्यरत असलेले ज्ञानेश्वर काळूराम चव्हाण हे आपल्या पत्नी व दोन मुलांसह मूळ गावी हिंगोली येथे गणेशोत्सवासाठी निघाले असताना अचानक बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
मंगळवारी (२६ ऑगस्ट) सायंकाळी सुमारे ५ वाजता चिपळूण परिसरात त्यांचा शेवटचा संपर्क झाला होता. त्यानंतर त्यांचे दोन्ही मोबाईल फोन बंद आल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली आहे.
चव्हाण यांनी मंगळवारी दुपारी गुहागरहून प्रवास सुरू केला होता. सायंकाळी चिपळूणला पोहोचल्यानंतर त्यांचा कोणताही संपर्क झाला नाही. तसेच या नंतरही त्यांचा आणि कुटुंबाचा काहीही थांगपत्ता लागत नाही, किंवा फोनही लागत नाही. दरम्यान, हिंगोली येथील नातेवाईक त्यांचा शोध घेण्यासाठी निघाले असून, मित्र व परिचितांकडेही चौकशी सुरू आहे.
चव्हाण कुटुंब ज्या गाडीने प्रवास करत होते ती गाडी किंवा त्यांना कोणी पाहिले असल्यास तातडीने माहिती द्यावी, असे आवाहन कुटुंबीयांनी केले आहे. मदतीसाठी भारत देवकांत पाटण (संपर्क : ९८५०२७७९४२) आणि अभिजित गोळे सर (संपर्क : ८९७५७३२०९४) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
या घटनेमुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, चव्हाण कुटुंब सुरक्षित असावे अशी प्रार्थना सर्वत्र केली जात आहे. नागरिकांना कोणतीही माहिती मिळाल्यास तातडीने पोलिसांना किंवा वरील संपर्कांवर कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

