(गुहागर)
गुहागर तालुक्यातील उमराठ खुर्द आंबेकरवाडीचे ज्येष्ठ नमन लोककलाकार आणि स्त्रीपात्र सादरीकरणातील दिग्गज गोविंद गोपाळ आंबेकर यांचा नमन लोककला संस्था, तालुका शाखा गुहागर यांच्या वतीने सन्मानपूर्वक गौरव करण्यात आला. शनिवार, दि. 10 जानेवारी 2026 रोजी गुहागर येथील भंडारी सभागृहात हा सोहळा पार पडला.
नमन लोककला संस्थेचे उपाध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांच्या हस्ते गोविंद आंबेकर यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. यावेळी गुहागर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष नीता मालप, माजी नगराध्यक्ष राजेश बेंडल, नगरसेवक प्रदीप बेंडल, अरुण परचुरे, पांडुरंग पाते, मानधन समिती सदस्य अमरदीप परचुरे, नमन लोककला संस्थेचे अध्यक्ष सुधाकर मास्कर, उपाध्यक्ष जगन्नाथ शिंदे, संदीप कानसे, सुधीर टाणकर, प्रमोद घुमे, मनसे तालुकाध्यक्ष सुनील हळदणकर आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच आंबेकर कुटुंबातील मुकुंद आंबेकर, राधा आंबेकर, सानिका माटल, वैष्णवी, शाम, पोलीस पाटील वासंती आंबेकर आणि उमराठचे सरपंच जनार्दन आंबेकर यांनीही उपस्थिती लावली.
गोविंद गोपाळ आंबेकर यांनी लहानपणापासूनच अभिनय, गायन, हार्मोनियम वादन, लेखन आणि लोककलेचे प्रशिक्षण देण्याचे कार्य अखंडपणे केले. नमनातील पौराणिक, धार्मिक, सामाजिक वगनाट्यांचे लेखन, गीतरचना, संगीत आणि दिग्दर्शन त्यांनी स्वतः केले. विशेष म्हणजे पंचरंगी गवळण ही त्यांची अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण भूमिका होती. अवघ्या काही क्षणांत वेगवेगळ्या साड्या व संपूर्ण नटशिखांत साज बदलत सादरीकरण करणे, ही त्यांची दुर्मीळ कला प्रेक्षकांना थक्क करणारी ठरली.
नमनासाठी लागणारे साहित्य जसे की गदा, मुकुट, मुखवटे, वीणा आदी स्वतः तयार करणे, भजन कार्यक्रम सादर करणे, मनोरंजनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करणे आणि तरुण पिढीला कलेचे प्रशिक्षण देणे, ही त्यांची ओळख होती. गणेशोत्सवात श्री गणेश मूर्ती आणि नवरात्रात देवीच्या मूर्ती घडवण्यातही ते पारंगत होते.
सन 1970 ते 2018 या कालावधीत, वयाच्या 68व्या वर्षांपर्यंत त्यांनी तब्बल 45 वर्षे नमन लोककलेत सक्रिय योगदान दिले. सत्यवान-सावित्री, हरिश्चंद्र-तारामती, दुष्यंत-शकुंतला, नल-दमयंती, संतसखू, भस्मासुर-मोहिनी यांसारख्या गाजलेल्या वगनाट्यांमधील प्रमुख स्त्रीपात्रे त्यांनी अजरामर केली. शास्त्रशुद्ध रागदारी गायन, गोड आवाज आणि प्रभावी अभिनयामुळे ते सर्वत्र लोकप्रिय ठरले.
गुहागर, चिपळूण आणि संगमेश्वर तालुक्यांतील १०० पेक्षा अधिक गावांमध्ये त्यांनी प्रमुख स्त्रीपात्र कलाकार म्हणून नमन सादर केले. त्यांच्या या प्रदीर्घ आणि समर्पित कार्याची दखल घेत कुणबी विकास सहकारी पतसंस्था मर्या., शाखा गुहागर-शृंगारतळी यांच्या वतीनेही दि. 16 जानेवारी 2026 रोजी त्यांच्या निवासस्थानी जाऊन विशेष सन्मान करण्यात आला.
या गौरवप्रसंगी उमराठचे सरपंच जनार्दन आंबेकर यांनी गोविंद गोपाळ आंबेकर यांना दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि सुखशांतीच्या शुभेच्छा देत त्यांच्या लोककलेतील अमूल्य योगदानाला मानाचा मुजरा केला.

