(गुहागर- रत्नागिरी/प्रतिनिधी)
पर्यटन हंगामाची धामधूम सुरू असतानाच गुहागरच्या पर्यटनाला प्रथमच गंभीर स्वरूपाचे गालबोट लागले आहे. समुद्रकिनारी फिरायला नेऊन गुंगीचे औषध देत एका अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग केल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी उघडकीस आला. याप्रकरणी गुहागर पोलीस ठाण्यात एका तरुणाविरोधात पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
गुहागर तालुक्यातील १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी ‘क्लास आहे’ असे सांगून प्रितेश सुर्वे (वय २९) याच्यासोबत समुद्रकिनारी फिरण्यासाठी गेली होती. त्यानंतर ‘पिक्चर पाहूया’ असे सांगत दोघे जवळच्या ठिकाणी गेले. मात्र चित्रपटगृह बंद असल्याने पुन्हा समुद्रकिनारी सुरूच्या बनात गेले. त्या ठिकाणी संबंधित तरुणाने मुलीला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अतिप्रसंग केल्याचा आरोप आहे. त्यानंतर तो तिला एका लॉजवर घेऊन गेला. सकाळी तिला घरी सोडण्यात आले.
दरम्यान, मुलगी घरी न परतल्याने पालकांसह वाडीतील नागरिकांनी तिचा शोध सुरू केला होता. पहाटे तीन वाजेपर्यंत संपूर्ण समुद्रकिनारी शोध मोहीम राबविण्यात आली. अखेर सकाळी गुहागर पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली. त्याचवेळी मुलगी घरी आल्याची माहिती घरून पोलिसांना देण्यात आली. घरी आल्यानंतर पालकांनी मुलीकडून सविस्तर माहिती घेतली. त्यानंतर पुन्हा पोलीस ठाण्यात येऊन संबंधित तरुणाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी आरोपीविरोधात पोक्सो कायद्यानुसार गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.

