(मुंबई)
वरिष्ठ IPS अधिकारी सदानंद दाते यांची महाराष्ट्राच्या नवे पोलिस महासंचालक (DGP) म्हणून निवड निश्चित झाली आहे. विद्यमान DGP रश्मी शुक्ला या 31 डिसेंबर रोजी निवृत्त होणार असून, त्यांच्या जागी दाते पदभार स्वीकारतील.
गृह खात्याने DGP पदासाठी 7 वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे (UPSC) पाठवली होती. या यादीत सदानंद दाते यांचे नाव सर्वात पहिले होते आणि अपेक्षेनुसार त्यांची अंतिम निवड झाली आहे. आता केवळ औपचारिक घोषणा बाकी आहे.
सदानंद दाते हे 1990 बॅचचे IPS अधिकारी असून कडक शिस्त, कामाप्रती निष्ठा आणि व्यावसायिक प्रामाणिकपणासाठी ते ओळखले जातात. आर्थिक गुन्हे शाखा, सायबर गुन्ह्यांचे तपास, रेल्वे पोलिस तसेच नवी मुंबईचे पोलिस अधीक्षक अशा विविध महत्त्वाच्या पदांवर त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्यात दाते यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. दाते तेव्हा मुंबई क्राइम ब्रांचमध्ये कार्यरत होते. दोन दहशतवादी मुंबईच्या कामा रुग्णालयात घुसले, तेव्हा दाते यांनी काही पोलिसांसह त्यांचा सामना केला. त्यांच्या सतर्कतेमुळेच कामा रुग्णालयातून ओलिसांना सुरक्षितपणे पळून जाता आले. त्यावेळी दाते यांना दहशतवाद्यांच्या गोळ्या लागल्या होत्या. आता त्यांच्यावर संपूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

