(रत्नागिरी)
शहरातील चर्मालयजवळ आज संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात मयूर घडशी (वय २१, रा. शिरगाव-तिवेंडेवाडी) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. त्याचा मित्र ओंकार सनगरे (वय २२) गंभीर जखमी असून त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ही दुर्घटना संध्याकाळी साडेसातच्या सुमारास घडली. मयूर व ओंकार हे दोघे दुचाकीवरून डीमार्टकडे खरेदीसाठी जात असताना समोरून येणाऱ्या भरधाव डंपरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की दुचाकीचा चक्काचूर झाला. या अपघातात मयूर चा जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर स्थानिकांनी धाव घेऊन जखमी ओंकारला रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून डंपर चालकाचा शोध सुरू केला आहे.
या घटनेने संपूर्ण रत्नागिरीत शोककळा पसरली असून, वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे नागरिकांत तीव्र चिंता व्यक्त होत आहे. अपघातांवर आळा घालण्यासाठी तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

