( रत्नागिरी /प्रतिनिधी )
प्रतिबंधित पानमसाला व सुगंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या तस्करीविरोधात जिल्हा पोलिसांनी आणखी एक मोठी कारवाई केली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (LCB) पथकाने घेतलेल्या धडक कारवाईत तब्बल ₹28 लाख 40 हजार 160 रुपयांचा गुटखा व चारचाकी वाहन असा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, सांगली जिल्ह्यातील दोघांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे व अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी कोकणात गुटखा तस्करीविरोधात कठोर कारवाईचे आदेश दिल्यानंतर ही कारवाई हाती घेण्यात आली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने दिनांक 27 ऑगस्ट रोजी देवरुख – साखरपा हद्दीत गस्त घालताना साखरपा-पाली मार्गावरील याहू ढाब्याजवळ संशयित अशोक लेलँड पिकअप (MH-10-CR-8366) वाहन अडवले. वाहनाची पंचासमक्ष झडती घेतली असता, पिकअपमध्ये गुटखा व तंबाखूजन्य पदार्थाने भरलेल्या गोण्या व बॉक्स आढळून आले. या चौकशीत संशयितांनी आपली नावे विकास गंगाराम पडळकर (वय 28, रा. इस्लामपूर, जि. सांगली) व तेजस विश्वास कांबळे (वय 23, रा. मिरज, जि. सांगली) अशी सांगितली. त्यांनी हा प्रतिबंधित माल संगमेश्वर परिसरात वितरणासाठी नेत असल्याची कबुली दिली.
झडतीत ₹21,40,160/- किमतीचा गुटखा व ₹7 लाखांचे वाहन असा एकूण ₹28,40,160/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या दोघांविरुद्ध देवरुख पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 123, 274, 275, 223, 3(5) तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 चे कलम 26 (2)(i), 26 (2)(iv), 27(3)(d), 30(2)(a), 3(1)(zz)(iv), 59 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे श्रेणी पो.उ.नि. श्री.ओगले, पो.हवा. झोरे, पो.हवा. डोमणे, पो.हवा. पालकर, पो. हवा.कदम, पो. हवा. खांबे, पो. हवा. सवाईराम, पो. हवा. दरेकर, पो. हवा. सावंत व चा.पो.कॉ. कांबळे यांनी सहभाग घेतला.

