(खेड)
खेड तालुक्यातील कोतवली येथे एक दुर्दैवी घटना घडली असून, रेल्वेतून पडून एका २० वर्षीय युवकाचा मृत्यू झाला आहे. करनकुमार कृष्णमोहन साह असे मृत युवकाचे नाव असून तो बिहारमधील सिवान जिल्ह्यातील पडरिया गावचा रहिवासी होता. ही घटना १३ मे रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. करनकुमार हा पनवेलहून चिपळूणकडे रेल्वेने प्रवास करत असताना कोतवली गावाजवळ अचानक गाडीतून खाली पडला. या अपघातात त्याच्या डोक्याला आणि कपाळाला गंभीर दुखापत झाली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच खेड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. करनकुमार रेल्वेतून नेमका कसा पडला, अपघात घडला की इतर काही कारण होते, याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. प्रवासादरम्यानची ही दुर्घटना रेल्वे सुरक्षेच्या दृष्टीने चिंतेची बाब असून, अधिक तपासानंतरच नेमका अपघाताचा कारणमिमांसा होणार आहे.