(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रत्नागिरी शहरातील मध्यवर्ती एस.टी. बसस्थानक येथे सरकारी कामकाजादरम्यान सहाय्यक वाहतूक अधीक्षकावर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना २५ ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली असून, यामुळे एस.टी. कर्मचाऱ्यांत मोठी खळबळ उडाली आहे.
फिर्यादी प्रद्युम्न दत्तात्रय शिरधनकर (५६, रा. पांडवनगर, नाचणे, रत्नागिरी) हे कार्यालयात रजिस्टर लिहिण्याचे काम करत असताना, अचानक आरोपी निखील चंद्रशेखर नार्वेकर (३६, रा. गोळपसडा, रत्नागिरी) आत घुसला. त्याने “तुला माज आला आहे, तुला ठार मारीन” अशी धमकी देत शिरधनकर यांच्या शर्टची कॉलर पकडली. त्यानंतर त्यांची मान जबरदस्तीने टेबलावर दाबून मानेवर व पाठीवर ठोसे मारले. याचवेळी आरोपीने फिर्यादींच्या गळ्यातील सोन्याची चैन तोडून ओढली, जी गहाळ झाली आहे. या हल्ल्यात शिरधनकर यांच्या कपड्यांचेही नुकसान झाले असून, सरकारी कामकाजात अडथळा आणल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात गु.र.नं. ३५९/२०२५ नोंदवण्यात आला असून, भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ कलम १३२, १२१(१), ३५१(२), ३५२, ३२४(२) अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस तपास सुरू आहे.

