(रत्नागिरी / प्रतिनिधी)
बॉक्साईट मटेरियलच्या व्यवसायातून मोठा आर्थिक फायदा मिळवून देण्याचे आमिष दाखवत निपाणी येथील एका नामांकित हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ५१ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी बेळगाव आणि रत्नागिरी येथील तिघांविरोधात बेळगावच्या टिळकवाडी पोलीस ठाण्यात फसवणूक व विश्वासघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपासाला गती दिली आहे.
फिर्यादीनुसार, निपाणी येथील प्रसिद्ध हॉटेल हरिप्रियाचे मालक तथा व्यावसायिक हर्ष आनंद शेट्टी (वय ५०) यांची अमृता गोविंद सूर्यवंशी (रा. महालक्ष्मी नगर, नवी गल्ली, पहिला क्रॉस, गणेशपूर, बेळगाव) तसेच रत्नागिरी येथील जे. पी. शिपिंग अँड ट्रेडिंग कंपनीचे मालक जितेश डी. यादव आणि प्रवीण यादव यांच्याशी ओळख झाली होती. या ओळखीचे रूपांतर व्यावसायिक व्यवहारात करत संशयितांनी बॉक्साईट मटेरियलचा संयुक्त व्यवसाय सुरू करण्याचा प्रस्ताव शेट्टी यांच्यासमोर ठेवला.
व्यवसायातून मोठ्या प्रमाणात नफा मिळेल, अशी खात्री देत संशयितांनी शेट्टी यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर ३ ऑक्टोबर २०२३ ते ७ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत विविध टप्प्यांत त्यांच्याकडून एकूण ५१ लाख रुपये स्वीकारले. मात्र, रक्कम हाती पडल्यानंतर व्यवसाय सुरू करण्याबाबत कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आली नाही. इतकेच नव्हे, तर व्यवसायातून कोणताही नफा मिळाला नाही आणि गुंतवलेली मूळ रक्कमही परत करण्यात आली नसल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. रक्कम परत मिळावी यासाठी हर्ष शेट्टी यांनी संबंधितांकडे वारंवार पाठपुरावा केला. मात्र, प्रत्येक वेळी टाळाटाळ करण्यात आल्याने आपली आर्थिक फसवणूक झाल्याची खात्री झाल्यानंतर त्यांनी टिळकवाडी पोलीस ठाण्यात धाव घेत अधिकृत तक्रार दाखल केली.
प्राथमिक चौकशीत आर्थिक व्यवहारासंदर्भातील करारपत्र बेळगाव येथे करण्यात आल्याचे निष्पन्न झाल्याने टिळकवाडी पोलिसांनी तिन्ही संशयितांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ४०६ (विश्वासघात) आणि ४२० (फसवणूक) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सीपीआय परशराम पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून आर्थिक व्यवहाराशी संबंधित कागदपत्रांची पडताळणी केली जात आहे.

