(ओरोस)
सावंतवाडी तालुक्यातील मळगाव ग्रामपंचायतीतील ग्रामविकास अधिकारी ज्ञानदेव सीताराम चव्हाण यांना लाच घेतल्याप्रकरणी अटक झाल्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी निलंबित करण्याचे आदेश जारी केले आहेत.
मळगाव येथील ‘वृक्षवल्ली गृहनिर्माण प्रकल्पा’तील घराचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर या घराचे घर पत्रक उतारे मिळविण्यासाठी विकासक विजय नाईक यांनी अर्ज दाखल केला होता. मात्र तब्बल आठ ते नऊ महिने उलटून गेले तरी ग्रामपंचायतीकडून उतारे देण्यात हेतुपुरस्सर टाळाटाळ केली जात होती. या काळात ग्रामविकास अधिकारी चव्हाण यांनी उतारा देण्यासाठी तब्बल एक लाख रुपयांची लाच मागणी केल्याचा आरोप आहे.
शेवटी, विकासक नाईक व चव्हाण यांच्यात ४० हजार रुपयांवर तडजोड झाली. त्यानंतर चव्हाण यांनी नाईक यांना फोन करून “सावंतवाडीतील एका हॉटेलमध्ये या” असे सांगितले. तेथे हजर झालेल्या नाईक यांनी लाचेची रक्कम चव्हाण यांना दिली असता, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले. या कारवाईनंतर चव्हाण यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.
दोन दिवसांची पोलिस कोठडी
या प्रकरणी त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा विशेष न्यायाधीश डॉ. सुधीर देशपांडे यांनी चव्हाण यांना २५ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या कारवाईनंतर कोकणात खळबळ उडाली असून ग्रामपंचायतीतील कारभाराबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

