(रत्नागिरी / प्रतिनिधी)
लग्नाचे आमिष दाखवून तरुणीशी शारीरिक संबंध प्रस्थापित करून नंतर तिच्या इच्छेविरुद्ध गर्भपात घडवून आणल्याच्या गंभीर आरोपाखाली संगमेश्वर तालुक्यात ग्रामसेवक म्हणून कार्यरत असलेला हरीदास शिवाजी बंडगर (रा. सलगर, ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली) याला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
पीडित तरुणीने याप्रकरणी सुरुवातीला आळंदी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर हा गुन्हा पुढील तपासासाठी देवरुख पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. तक्रारीत तरुणीने म्हटले आहे की, आरोपी बंडगर याने लग्नाचे आमिष दाखवून आळंदी व देवरुख येथे तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर ती गर्भवती झाल्यावर तिच्या इच्छेविरुद्ध गर्भपात घडवून आणण्यात आला.
या प्रकरणी सोमवारी पोलिसांनी हेडकॉन्स्टेबल प्रशांत मसुरकर, सचिन कामेरकर व सचिन पवार यांच्या पथकाद्वारे बंडगरला अटक केली. पुढील तपास पोलिस निरीक्षक उदय झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या घटनेमुळे तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून, शासकीय पदावर कार्यरत असलेल्या व्यक्तीकडूनच अशाप्रकारे फसवणूक झाल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

