( मुंबई )
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून बाहेर पडल्यानंतर प्रकाश महाजन कोणता राजकीय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून प्रकाश महाजन यांनी आज शिवसेना शिंदे गटात अधिकृत प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला.
राज ठाकरे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे प्रकाश महाजन गेल्या काही दिवसांपासून मनसेमध्ये नाराज होते. याच नाराजीमुळे त्यांनी 13 सप्टेंबर रोजी मनसेच्या प्रवक्तेपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ते कोणता राजकीय मार्ग निवडणार, याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात होते.
बुधवारी प्रकाश महाजन यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत शिवसेनेत प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर आज त्यांनी अधिकृतपणे धनुष्यबाण हाती घेत शिंदे गटात प्रवेश केला. विशेष म्हणजे हा पक्षप्रवेश कोणत्याही गाजावाजाविना पार पडला.
महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ असताना मनसेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. प्रकाश महाजन यांच्या प्रवेशामुळे आगामी निवडणुकांवर काय परिणाम होणार, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

