(साखरपा / भरत माने)
भडकंबा गावाने नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रम, शैक्षणिक उपक्रम, वैयक्तिक लाभाच्या योजना आणि समाजोपयोगी कार्यक्रम राबवत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे हे गाव विकसनशील गाव म्हणून ओळखले जाते. सध्या सुरू असलेल्या विविध विकासकामांसह अनेक नवीन कामांना मंजुरी मिळाली असून पावसाळ्यानंतर त्यांची गती वाढणार आहे.
अलीकडेच गावात उत्तम दर्जाची लाईट व्यवस्था निर्माण करण्यासाठी एक आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. गावातील दिवंगत व्यक्तींच्या स्मरणार्थ त्यांच्या वारसदारांकडून देणगी स्वरूपात पथदिवे उभारण्यात आले. प्रत्येक पथदिव्यावर दिवंगत व्यक्तींचे नाव रेडियमने कोरलेले स्मरणफलक लावण्यात आले असून, देणगीदारांचे नावही त्यावर नमूद करण्यात आले आहे. यामुळे गावात पथदिव्यांची सोय झालीच, शिवाय दिवंगत व्यक्तींना एक अद्वितीय श्रद्धांजलीही वाहिली गेली आहे.
या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून गावाच्या विकासयात्रेत आणखी अनेक योजना व उपक्रम राबवले जातील, असे प्रशांत (बापू) शिंदे यांनी सांगितले.

