(पोलादपूर / शैलेश पालकर)
मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटात पेप्सी बॉटल्स वाहतूक करणारा कंटेनर कलंडल्याची घटना आज (बुधवारी) सकाळी घडली. महामार्गाचे चौपदरीकरण होऊनही धोकादायक वळणे कायम ठेवल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र एका लेनवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली.
लोटे येथून भिवंडी-वाड्याकडे पेप्सी बॉटल्स घेऊन जाणारा कंटेनर (क्रमांक MH 43 GE 2244) कशेडी घाटात पोलादपूरजवळील चोळई गावच्या हद्दीत असलेल्या तीव्र उताराच्या वळणावर आला असता चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. त्यामुळे कंटेनर कलंडून महामार्गावर आडवा झाला. कंटेनरमधील पेप्सीच्या बॉटल्स रस्त्यावर सर्वत्र पसरल्या, तर ड्रायव्हर केबिन रोड डिव्हायडरवर चढली. परिणामी मुंबईकडे जाणारी एक लेन पूर्णपणे बंद झाली.
या घटनेची माहिती मिळताच पोलादपूर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक मंगेश मुंढे यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. कशेडी महामार्ग पोलीसही तत्काळ दाखल झाले. वाहतूक पोलादपूर ते गोवा दिशेने एकाच लेनवर वळवण्यात आली. त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी टळली.
रस्त्यावर पसरलेल्या पेप्सी बॉटल्स बाजूला करण्याचे तसेच क्रेनच्या सहाय्याने कंटेनर रस्त्याबाहेर काढण्याचे काम पोलीसांच्या देखरेखीखाली सुरू होते. मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण सुरू असतानाही कशेडी घाटातील अपघातप्रवण तीव्र उतार व धोकादायक वळणे हटवण्यात आलेली नाहीत. विशेषतः चोळई हद्दीतील या घाटरस्त्यावर वारंवार अपघात घडत असून, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी वाहनचालकांकडून होत आहे.

