(देवरूख / प्रतिनिधी)
देवरूखजवळील पाटगावचे माजी सरपंच आणि शासकीय ठेकेदार सुनिल काशिनाथ साळवी (वय ५८) यांचे काल सायंकाळी प्रदीर्घ आजाराने दुःखद निधन झाले.
पाटगावच्या ग्रामविकासात मोलाचे योगदान देणारे व कुंभार समाजाचे नेते म्हणून ओळखले जाणारे साळवी हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. अनेक वर्षे ग्रामपंचायत सदस्य तसेच काही काळ सरपंच म्हणून कार्य करत त्यांनी गावच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजना राबवल्या. जिल्ह्यातील विविध संस्थांच्या माध्यमातूनही ते सक्रिय राहून सामाजिक कामकाजात पुढाकार घेत असत.
मागील वर्षभरापासून ते मधुमेहाच्या आजाराने त्रस्त होते. त्यांच्या निधनाने पाटगावसह पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत असून कुंभार समाजावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे असा परिवार आहे. रात्री उशिरा पाटगाव स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
माजी राज्यमंत्री रवींद्र माने, युवानेते प्रग्धुम्न माने, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बारक्याशेठ बने, तालुकाध्यक्ष बाबा साळवी, माजी सरपंच शाम खेडेकर, अशोक पागार, शिवसेना युवानेते रोहन बने, पुरचे सरपंच सुबोध पेडणेकर आदींसह विविध संस्थांचे पदाधिकारी, ठेकेदार व पंचक्रोशीतील ग्रामस्थ अंत्ययात्रेत मोठ्या संख्येने उपस्थित होते.

