(देवळे / प्रकाश चाळके)
संगमेश्वर तालुक्यातील देवळे येथील शेतकरी दिलीप शिर्के यांच्या भातशेतीचे गवा रेड्यांनी प्रचंड नुकसान केले असून आता त्या शेतातून त्यांना उत्पन्न येऊ शकणार नाही, अशी खंत शिर्के यांनी व्यक्त केली आहे.
देवळे-चाफवली मार्गालगत असलेल्या त्यांच्या शेतात गवा रेड्यांच्या कळपाने धुडगूस घातला. गर्भात आलेले तसेच लोंबी बाहेर पडू लागलेले भात रेड्यांनी पूर्णपणे खाऊन टाकल्याने संपूर्ण वर्षभराची मेहनत वाया गेली आहे. त्यांचे शेताचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून शिर्के यांना या हंगामात कुठलाही परतावा मिळणार नाही.
अशाच प्रकारचे नुकसान चाफवली येथील विठ्ठल (आप्पा) चाळके यांच्या शेताचेही झाले आहे. यापूर्वीही गवा रेड्यांनी भाताची रोपे कुरतडल्यामुळे शेतकऱ्यांनी नव्याने खतपाणी घालून मेहनतीने लावणी केली होती. मात्र आत्ता पुन्हा गवा रेड्यांच्या कळपांनी शेतातील भातशेती उध्वस्त केली असून तळाशी फक्त बुंदे उरले आहेत. यामुळे या मोसमात पुन्हा पीक येण्याची शक्यता नाही.
या नुकसानीची योग्य नुकसानभरपाई वनविभागामार्फत मिळावी तसेच गवा रेड्यांचा बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी देवळे पंचक्रोशीतील शेतकऱ्यांकडून होत आहे.

