(रत्नागिरी / प्रतिनिधी)
कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांच्या सुरक्षेसाठी दीर्घकाळाची मागणी अखेर पूर्ण झाली आहे. रत्नागिरी येथील नव्याने स्थापन केलेल्या रेल्वे पोलीस ठाण्याचे उद्घाटन आज (२५ ऑगस्ट २०२५) सकाळी १० वाजता लोहमार्ग पोलीस महासंचालक श्री. प्रशांत बुरडे यांच्या शुभहस्ते ऑनलाईन पद्धतीने संपन्न झाले.
या सोहळ्यास लोहमार्ग पोलीस आयुक्त श्री. एम. राकेश कलासागर, कोकण रेल्वे कॉर्पोरेशनचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. संतोषकुमार झा, कोकण रेल्वेचे क्षेत्रीय प्रबंधक श्री. शैलेश बापट, महानिरीक्षक अभिषेक कुमार, जिल्हाधिकारी श्री. एम. देवेंद्र सिंह, रत्नागिरी पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वैदेही रानडे आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच लोहमार्ग विभागातील अनेक पोलीस उपआयुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त व वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही या सोहळ्यात सहभाग नोंदवला.
रेल्वे कार्यक्षेत्रातील वाढता व्याप, प्रवाशांची वाढती संख्या, गुन्हेगारीवर नियंत्रण तसेच प्रवाशांना अधिक सुरक्षितता देण्याच्या उद्देशाने रत्नागिरी येथे रेल्वे पोलीस ठाणे स्थापन करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला होता. गृह विभागाने ७ ऑगस्ट २०२४ रोजी याला मंजुरी दिली आणि प्रत्यक्षात हे ठाणे उभे राहिले. ठाण्याच्या निर्मितीत केंद्रीय रेल्वे, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल आणि जिल्हाधिकारी कार्यालयाची मोठी मदत मिळाली.
रत्नागिरी रेल्वे पोलीस ठाण्याच्या स्थापनेमुळे पनवेल रेल्वे पोलीस ठाण्याचे कार्यक्षेत्र कमी झाले असून आता नव्या कार्यक्षेत्रात सोमाटणे, आपटा, जिते, पेण, कासु, नागोठणे आणि रोहा या स्थानकांचा समावेश झाला आहे. हे ठाणे हार्बर विभागातील सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या अखत्यारीत राहणार असून पोलीस उपआयुक्त (मध्य परिमंडळ) यांच्या थेट नियंत्रणाखाली काम करणार आहे.
प्रवासी सुरक्षेला नवी दिशा
कोकण रेल्वे हा भारतातील सर्वाधिक रम्य पण भौगोलिकदृष्ट्या कठीण असा रेल्वेमार्ग मानला जातो. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सक्षम पोलीस यंत्रणा तैनात होणे ही काळाची गरज होती. रत्नागिरी येथे नव्या ठाण्याची उभारणी झाल्यामुळे आता प्रवाशांना सुरक्षिततेची नवी हमी मिळणार आहे.

