( संगमेश्वर /प्रतिनिधी )
वेगवेगळ्या सणासमारंभात वेगवेगळ्या प्रथा परंपरा दिसून येतात. संगमेश्वर परिसरातील काही गावांमध्ये अशीच एक परंपरा दिवाळीच्या सणाशी निगडीत आहे. इथे परीट समाजाच्या लोकांनी ओवाळणी केल्याशिवाय ब्राह्मण समाजाची दिवाळी सुरू होत नाही.
दिवाळी हा दिव्यांचा सण. नरक चतुर्दशी ह्या दिवशी केल्या जाणार्या अभ्यंग स्नानाला मोठे महत्व आहे. दिवाळीचा पहिला दिवस आणि पहिली आंघोळ म्हणून ह्या स्नानाची ओळख आहे. सकाळी लवकर उठून, सुगंधी उटणे लावून स्नान करणे आणि त्यानंतरचा फराळ म्हणजे दिवाळीच्या सणाचा अविभाज्य भाग असतो.पण संगमेश्वर परिसरात परीट समाज ह्या दिवशी एक आगळीवेगळी परंपरा जपत आहे. धामणी येथे रहाणार्या मारुती गंगाराम चव्हाण यांनी ह्या चार पिढ्यांच्या परंपरेची माहिती दिली. नरक चतुर्दशीच्या दिवशी धामणी गावातील परीट समाजाचे लोक पहाटे घराबाहेर पडतात आणि गावातील ब्राह्मण, खोत यांच्याकडे जातात. पूर्वी अभ्यंग स्नानाला आशा घरातील ज्येष्ठांना ओवाळून त्यांना उटणे लावण्याचा परंपरा हे परीट समाजाचे लोक जपत असत. कालांतराने आंघोळीच्या वेळी उटणे लावण्याची परंपरा मागे पडली पण घरी जाऊन ओवाळणी करण्याची प्रथा आजही सुरू आहे. ह्या लोकांनी घरी येऊन ओवाळून होईपर्यंत ब्राह्मण आणि गावातील प्रतिष्ठित समाजाच्या घरात फराळाला प्रारंभ होत नसे. आजही ही प्रथा सुरू आहे. आजही ओवाळणी करता हे लोक येत असल्यामुळे घराघरात त्यांची वाट पाहिली जाते. ओवाळून झाल्यानंतर दिवाळी भेट म्हणून त्यांना घराघरातून यथाशक्ती ओवाळणी दिली जाते.
पूर्वी गावातील ब्राह्मण समाजापुरती मर्यादित असलेली ही परंपरा आता मात्र गावात बर्याच घरांमध्ये पसरली आहे. अन्य समाजाच्या घरातही चव्हाण कुटुंबिय जावून घरातील ज्येश्ठांची ओवाळणी करतात. रस्त्याने येताजाताही अनेक जण थांबून त्यांच्याकडून ओवाळून घेत असल्याचे चव्हाण सांगतात.
धामणी गावातील परीट समाजाच्या लोकांच्या भावकीतील काही लोक व्यवसायानिमित्य संगमेश्वर आणि कसबा इथे स्थायिक झाले आहेत. असे असले तरी तेही त्या परिसरात ही परंपरा चालवत आहेत.