(देवळे / प्रकाश चाळके)
संगमेश्वर तालुक्यातील देवळे गावात गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली बसथांबा शेड उभारणीची मागणी अखेर पूर्ण झाली आहे. ही सुविधा भाजप प्रदेशाध्यक्ष व आमदार रवींद्र चव्हाण यांच्या स्वनिधीतून उभारण्यात आली आहे.
देवळे बाजारपेठ परिसरात यापूर्वी लहान आकाराची बसथांबा शेड होती; मात्र त्याची अवस्था अत्यंत जीर्ण झाली होती. ही समस्या भाजप कार्यकर्ते प्रबोध आठल्ये यांनी अमित केतकर यांच्याकडे मांडली. पुढे अमित केतकर यांनी ही मागणी थेट रवींद्र चव्हाण यांच्यापर्यंत पोहोचवली.
त्यांच्या स्वनिधीतून मिळालेल्या निधीतून नव्या बसथांबा शेडचे बांधकाम करण्यात आले आहे. नुकतेच या शेडचे उद्घाटन अमित केतकर व प्रबोध आठल्ये यांच्या हस्ते संपन्न झाले. या सुविधेमुळे स्थानिक प्रवाशांना पावसाळा व उन्हाळ्यात दिलासा मिळणार असून गावकऱ्यांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले आहे.