(नागपूर)
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने एक क्रांतीकारक पाऊल टाकत नागपूर जिल्ह्यातील सातनवरी हे देशातील पहिले स्मार्ट व इंटेलिजंट गाव म्हणून विकसित करण्यात आले आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेती, आरोग्य, शिक्षणासह विविध सुविधा गावात उपलब्ध करून देत हे रोल मॉडेल साकारण्यात आले आहे.
राज्यातील प्रत्येक तालुक्यातील १० गावे स्मार्ट व इंटेलिजंट करण्याचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात तब्बल ३,५०० गावे स्मार्ट बनवली जाणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
केंद्रीय दूरसंचार मंत्रालय, राज्य शासन आणि नागपूर जिल्हा प्रशासन यांच्या सहकार्याने हा प्रायोगिक प्रकल्प उभारण्यात आला आहे. सातनवरी गावातील या प्रकल्पाचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.
ते म्हणाले, “तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून गावांना सक्षम बनविण्याच्या दिशेने सातनवरीचा हा उपक्रम एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीतून भारतनेट प्रकल्प उभा राहिला आणि त्याच्या धर्तीवर महाराष्ट्रात महानेट प्रकल्प राबवण्यात आला. आता त्याचाच विस्तार म्हणून सातनवरी गावात १८ सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.” यामध्ये स्मार्ट सिंचन, ड्रोनद्वारे कीटकनाशक व खत फवारणी, टेलिमेडिसिन, बँक ऑन व्हिल, स्मार्ट सुरक्षा प्रणाली यांचा समावेश आहे.
सातनवरीतील शेतकरी ड्रोन व सेन्सरच्या मदतीने माती परीक्षण, खते व फवारणीचे नियोजन करून उत्पादन खर्च कमी करत उत्पन्न वाढवू शकतील. गावातील पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता सुधारल्याने आरोग्य सुधारेल. टेलिमेडिसिनच्या माध्यमातून गावकऱ्यांना तात्काळ आरोग्य सुविधा मिळणार आहेत.
शिक्षण क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता व स्मार्ट शिक्षण पद्धतींचा वापर सुरू झाल्याने विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे ज्ञान मिळणार असून सातनवरी गाव देशात एक रोल मॉडेल ठरणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

