( नवी दिल्ली )
ऑस्ट्रेलियाने 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया वापरावर बंदी घातल्यानंतर भारतातही अशाच प्रकारचे वयानुसार निर्बंध लागू होण्याचे संकेत मिळाले आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर वयानुसार नियमन लागू करण्याबाबत भारत सरकार कंपन्यांशी चर्चा करत असल्याची माहिती केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. नवी दिल्ली येथे झालेल्या एआय इम्पॅक्ट समिटमध्ये त्यांनी ही भूमिका मांडली.
मंत्री वैष्णव म्हणाले की, डीपफेक तंत्रज्ञानाचा धोका वेगाने वाढत असून त्याचा सर्वाधिक परिणाम मुलांवर आणि समाजावर होत आहे. “डीपफेक आणि वयानुसार निर्बंध या दोन्ही मुद्द्यांवर आम्ही सोशल मीडिया कंपन्यांशी चर्चा करत आहोत. विद्यमान नियम पुरेसे नाहीत. अधिक कठोर आणि स्पष्ट नियमनाची गरज आहे,” असे त्यांनी सांगितले.
सर्व प्लॅटफॉर्म्सना भारतीय कायदे बंधनकारक
नेटफ्लिक्स, यूट्यूब, मेटा किंवा एक्स (ट्विटर) यांसारखा कोणताही प्लॅटफॉर्म असो, त्यांना भारतीय संविधान आणि कायदेशीर चौकट पाळावीच लागेल, असे वैष्णव यांनी स्पष्ट केले. संसदेच्या समितीनेही डीपफेकचा सखोल अभ्यास केला असून, संसदेत व्यापक सहमतीने अधिक कडक नियम आणणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. ऑस्ट्रेलियासह अनेक देशांनी वयानुसार सोशल मीडिया नियमन स्वीकारले आहे. “डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन (DPDP) कायद्यात आम्ही आधीच विद्यार्थ्यांसाठी आणि तरुणांसाठी कंटेंटविषयक वेगळे निकष ठरवले आहेत,” असेही त्यांनी सांगितले.
एआय इम्पॅक्ट समिटमध्ये स्वदेशी एआय मॉडेल्सचे प्रदर्शन
एआय इम्पॅक्ट समिटमध्ये भारतातील संप्रभू (स्वदेशी) एआय मॉडेल्सचे प्रदर्शन करण्यात आले. हे मॉडेल्स जागतिक पातळीवरील मोठ्या एआय मॉडेल्सच्या तोडीस तोड असल्याचा दावा वैष्णव यांनी केला. “एआय मिशन 2.0 अंतर्गत मोठ्या पायाभूत सुविधा उभारल्या जातील. यामुळे भारतात एआय अधिक सुलभ आणि प्रभावी होईल,” असे ते म्हणाले.
भाषा मॉडेल्ससाठी 12 संस्थांची निवड
भारतीय डेटासेटवर आधारित मोठे आणि छोटे भाषा मॉडेल्स विकसित करण्यासाठी 12 संस्था आणि संघांची निवड करण्यात आली आहे. यात सर्वम एआय, सोकेत एआय, ज्ञानी एआय, गण एआय, अवतार एआय, आयआयटी बॉम्बे संघ (भारतजेन), जेनलूप, झेंटिक, इंटेलिहेल्थ, शोध एआय, फ्रॅक्टल अॅनालिटिक्स आणि टेक महिंद्रा मेकर्स लॅब यांचा समावेश आहे. जागतिक स्तरावर चॅटजीपीटी, जेमिनी यांसारखी एआय मॉडेल्स व्यावसायिक वापरात आली आहेत. भारतातही पुढील एक ते दोन वर्षांत 20 हजार कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक निश्चित झाल्याचे वैष्णव यांनी सांगितले.
या एआय इम्पॅक्ट समिटला मोठा प्रतिसाद मिळाला असून तीन लाखांहून अधिक लोकांनी नोंदणी केली आहे. सर्व सत्रे हाऊसफुल्ल असून एआयबाबत देशात प्रचंड उत्साह असल्याचे चित्र दिसत असल्याचे वैष्णव यांनी नमूद केले.

