(हिंगोली)
लग्नाच्या आमंत्रणाच्या बहाण्याने डिजिटल फसवणुकीचा प्रकार हिंगोली जिल्ह्यात उघडकीस आला आहे. एका सरकारी कर्मचाऱ्याला व्हॉट्सअॅपवर आलेल्या खोट्या लग्नाच्या आमंत्रणामुळे तब्बल २ लाख रुपयांना चुना लागला आहे.
सायबर सेलच्या माहितीनुसार, पीडितेला एका अज्ञात क्रमांकावरून मेसेज आला होता. त्यात लिहिले होते, “स्वागत आहे. लग्नाला ३०/०८/२०२५ रोजी नक्की या.. प्रेम ही आनंदाची दार उघडणारी मास्टर की आहे.” या मेसेजखाली पीडीएफसारखे दिसणारे लग्नाचे आमंत्रण जोडलेले होते. मात्र, ती फाइल प्रत्यक्षात एक अँड्रॉइड एप्लिकेशन पॅकेज (APK file) होती.
पीडितेने फाइलवर क्लिक करताच ती फाइल फोनमध्ये इंस्टॉल झाली आणि सायबर गुन्हेगारांना मोबाईलमधील संवेदनशील डेटावर प्रवेश मिळाला. त्यानंतर फसवणूक करणाऱ्यांनी खात्यातून १,९०,००० रुपये चोरले. या प्रकरणी हिंगोली पोलिस स्टेशन व सायबर सेल विभागात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या वर्षीही अशाच प्रकारे लग्नाच्या आमंत्रणाच्या नावाखाली फसवणूक झाल्याचे समोर आले होते. या प्रकारात अनेकांना आर्थिक फटका बसला होता.
सायबर तज्ज्ञांच्या मते, लग्नाचे आमंत्रण किंवा इतर कोणतीही फाइल अज्ञात नंबरवरून आल्यास ती कधीही डाउनलोड किंवा इंस्टॉल करू नये. कारण एकदा APK फाइल फोनमध्ये गेल्यावर गुन्हेगार मोबाईलवरील हालचालींवर लक्ष ठेवू शकतात, बँकिंग माहिती चोरू शकतात तसेच मालक असल्याचे भासवून पैशांची मागणी करून आणखी फसवणूक करू शकतात.

