(नाशिक / प्रतिनिधी)
अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाच्या बालसंस्कार व युवा प्रबोधन विभागातर्फे परमपूज्य गुरुमाऊली श्री. आण्णासाहेब मोरे यांच्या आशीर्वादाने व गुरुपुत्र नितीनभाऊ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुसंस्कारित पिढी घडविण्यासाठी बहुविध स्तुत्य उपक्रम राबविले जात आहेत.
मागील ऑगस्ट आणि सध्या सुरू असलेल्या सप्टेंबर महिन्यात राज्यभरातील लाखो विद्यार्थ्यांकडून दररोज सामूहिक गणपती अथर्वशीर्ष पठण करून घेण्यात येत आहे. या सेवेला प्रत्येक जिल्ह्यामधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आजवर गणपती अथर्वशीर्षाची लक्षावधी आवर्तने मुलांनी श्रींच्या चरणी समर्पित केली आहेत. महाराष्ट्रसह इतर राज्यातील मुलेही या उपक्रमात आनंदाने सहभागी झाली आहेत. घरोघरी पुंडलिक आणि श्रावण बाळ तयार झाले तर “वृद्धाश्रममुक्त भारताची” संकल्पना साकार होईल अशी गुरुमाऊलींची आज्ञा आहे. त्यानुसार बालसंस्कार व युवा प्रबोधन विभागाने या ध्येयाच्या पूर्ततेसाठी अत्यंत नियोजनपूर्वक व्यापक स्वरूपात कामाला सुरुवात केली आहे.
ऋणानुबंध कार्यक्रमाचे आयोजन..
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे पालक आणि पाल्य यांच्यामध्ये निर्माण होणारे गैरसमज, तणाव, अवास्तव अपेक्षा दूर करून घराघरात सुसंवाद निर्माण व्हावा याकरिता “ऋणानुबंध – एक सुसंवाद” हा उपक्रम ठिकठिकाणी घेण्यात येत आहे. शिक्रापूर सेवा केंद्र, कागल सेवाकेंद्र आदी ठिकाणी झालेल्या कार्यक्रमाला पालक, मुले आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अत्यंत भावपूर्ण वातावरणात झालेल्या सुसंवादाच्या उपक्रमात सहभागी झालेले पालक आणि मुलांना अक्षरशः गहिवरून आले. “ऋणानुबंध-पालक-पाल्य संवाद” हा उपक्रम पालक आणि पाल्यांना संवादात्मक जोडणारा एक महत्त्वाचा दुवा आहे अशा प्रतिक्रिया अनेक पालकांनी व्यक्त केल्या.
गर्भवती माता, मुली आणि युवकांना मार्गदर्शन..
जामनेर येथील शेंदुरणी प्राथमिक आरोग्य केंद्रात तसेच हातकणंगले येथील हेरले सेवाकेंद्रात गर्भवती मातांना गर्भसंस्काराचे महत्व पटवून देण्यात आले तसेच किशोरवयीन मुलींनी शारीरिक व मानसिक आरोग्याची काळजी कशाप्रकारे घ्यावी त्याबाबत माहिती देण्यात आली. जळगावमधील कल्याणी नगर सेवाकेंद्रात युवकांना मार्गदर्शन करण्यात आले. आजच्या युवा पिढीला पितरांचे महत्त्वही समजावून सांगण्यात आले.
मूल्यसंस्कार प्रतिनिधी कार्यशाळा…
बालसंस्कार आणि युवा प्रबोधनाची चळवळ अधिक गतिमान करण्यासाठी अहिल्यानगर केडगाव सेवाकेंद्रात तसेच मुंबई पाच झोन अंतर्गत मूल्यसंस्कार प्रतिनिधींची प्रशिक्षण कार्यशाळा मोठ्या उत्साहात आणि प्रतिसादात पार पडली. जळगावमध्ये जिल्हास्तरीय प्रशिक्षणही घेण्यात आले तर येत्या २० सप्टेंबर रोजी नवनाथ मठ सिंदखेडा (धुळे) येथे उत्तर महाराष्ट्र विभागीय मासिक प्रशिक्षण चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
ही चळवळ राष्ट्रासाठी- नितीनभाऊ मोरे
हे सर्व उपक्रम, कार्यक्रम आणि सेवा आजची पिढी सुसंस्कारित होऊन आदर्श नागरिक आणि सदाचारी नागरिक बनावी आणि राष्ट्राच्या कल्याणामध्ये तिचे योगदान रहावे या उद्देशाने राबविले जात आहेत अशी माहिती गुरुपुत्र श्री नितीनभाऊ मोरे यांनी दिली. सेवामार्गातर्फे नियमितपणे बालसंस्कार केंद्र सुरू असून सेवाकेंद्र तेथे बालसंस्कार केंद्र उभारले जात आहेत. ग्राम अभियानाच्या माध्यमातून बालसंस्कारची चळवळ अधिक गतिमान करण्यात येत आहे असे त्यांनी स्पष्ट केले.

