(खेड)
गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपल्याने मुंबईतील चाकरमान्यांची कोकणाकडे मोठ्या प्रमाणावर धाव सुरू आहे. दरम्यान, आज (रविवार) पहाटे रत्नागिरीतील कशेडी बोगद्याजवळ मोठी दुर्घटना घडली. मुंबईहून मालवणकडे जाणाऱ्या खासगी लक्झरी बसला अचानक आग लागली. पाहता पाहता संपूर्ण बस जळून खाक झाली. मात्र चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला असून ४० ते ४५ प्रवाशी सुखरूप बचावले आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, पहाटे साधारण दोनच्या सुमारास बस कशेडी बोगद्याच्या परिसरात पोहोचली असता, टायर गरम झाल्याने अचानक पेट घेतला. काही क्षणांतच ही आग बसच्या इतर भागात पसरली. त्यावेळी प्रवाशी गाढ झोपेत होते. पण चालकाने तत्काळ बस रस्त्याच्या बाजूला थांबवून सर्व प्रवाशांना सुरक्षित खाली उतरवले. त्यामुळे एकाही प्रवाशाला दुखापत झाली नाही.
खेड नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाला लगेच कळविण्यात आले. पथकाने घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवलं. मात्र तोपर्यंत प्रवाशांचे सर्व सामान जळून खाक झाले. गणेशोत्सवासाठी बहुतांश प्रवाशी मोठ्या प्रमाणात सामान घेऊन गावी निघाले होते. आग अचानक लागल्याने सामान बाहेर काढण्याची वेळ मिळाली नाही.
दुर्घटनेनंतर प्रवाशांना पर्यायी बसची सोय करून पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आले. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र चालकाच्या तत्परतेमुळे ४५ जीव थोडक्यात बचावले आहेत.

