(रत्नागिरी)
कोकणात गणेशोत्सवाच्या उत्सवमूर्तीचा आनंद दुपटीने वाढवण्यासाठी कोकण रेल्वेने अनोखी पाऊल उचलली आहे. सावंतवाडी, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण आणि खेड या स्थानकांवर तात्पुरते पूजासाहित्य आणि खाद्यपदार्थ विक्रीसाठी स्थानिकांना विशेष परवानगी देण्यात आली आहे.
उत्सवकाळात कोकणातील रेल्वेस्थानकांवर प्रवाशांची गर्दी जास्त असल्यामुळे, प्रवाशांच्या सोयीसाठी मध्यरेल्वे, कोकण रेल्वे आणि पश्चिम रेल्वे यांनी नियमित गाड्यांसह विशेष रेल्वेगाड्यांचेही आयोजन केले आहे. २४ ऑगस्ट ते ५ सप्टेंबरपर्यंतच्या काळात या स्थानकांवर स्टॉल उभारण्याची संधी मिळणार असून, गणपती पूजेसाठी आवश्यक समई, ताम्हण, घंटी, फुले, दुर्वा, पत्री, अगरबत्ती, धूप, सजावटीच्या वस्तू तसेच मोदक, पेढा, साखरफुटाणे, बर्फी यांसारखे खाद्यपदार्थ विक्रीसाठी ठेवता येतील.
या स्टॉल्ससाठी स्वयंसहाय्यता गट, महिला बचतगट आणि वैयक्तिक बिगर सरकारी संस्था अर्ज करु शकतात. स्थानिकांनी स्वतः स्टॉलची उभारणी करावी लागणार असून, जागा रेल्वे प्रशासनाकडून उपलब्ध करून दिली जाईल. खाद्यपदार्थांवर FSSAI प्रमाणपत्र क्रमांक, दर, वजन, उत्पादन तारीख व समाप्ती तारीख असणे अनिवार्य आहे.
प्रत्येक स्थानकासाठी फक्त तीन स्टॉल्स दिले जातील. १३ दिवसांच्या उत्सवासाठी प्रत्येक स्टॉलसाठी दोन हजार रुपये आणि १३ टक्के जीएसटी लागू होईल, असे वरिष्ठ अधिकारी सांगितले आहे. कोकणातील स्थानिकांसाठी रोजगाराची संधी आणि प्रवाशांसाठी सुलभता या दोन्हीचा संगम या गणेशोत्सवात रेल्वेस्थानकांवर पाहायला मिळणार आहे.

