(खेड)
खेड शहरातील बसस्थानकाजवळील विदर्भ कोकण बँकेत कार्यरत असलेल्या सुप्रिया विनायक वनशा (वय ३२, रा. भाईंदर – ठाणे) या तरुणीने नैराश्याच्या स्थितीत आत्महत्या केल्याचे पोलीस तपासातून उघड झाले आहे. भावाच्या आत्महत्येचे दुःख तिला सहन न झाल्याने तिने हे टोकाचे पाऊल उचलले, असे या घटनेतील प्राथमिक निष्कर्षातून स्पष्ट झाले आहे. खेड पोलीस ठाण्यात याबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
तीन महिन्यांपूर्वी भावाची आत्महत्या
सुप्रिया वनशा ही गेल्या काही महिन्यांपासून खेडमधील ग. म. पाटणे संकुलातील रूम नं. ३०२ मध्ये एकटी राहात होती. तीन महिन्यांपूर्वी तिच्या भावाने सततच्या आजारपणाला कंटाळून आत्महत्या केली होती. या घटनेचा तिच्या मनावर खोल आघात झाला होता. त्या दिवसानंतर ती सतत तणावाखाली राहू लागली, अशी माहिती तिच्या सहकाऱ्यांनी दिली.
दि. २३ मे रोजी सुप्रियाने आपल्या राहत्या फ्लॅटमध्ये ओढणीच्या सहाय्याने लोखंडी हुकाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना उघडकीस आल्यानंतर शहरात हळहळ व्यक्त करण्यात आली होती.
डायरीतून उलगडला आत्महत्येचा निर्णय
या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांना सुप्रियाने लिहिलेली डायरी सापडली असून तीच या आत्महत्येच्या कारणाचा महत्त्वाचा पुरावा ठरली आहे. त्या डायरीत तिने भावाच्या आत्महत्येमुळे झालेल्या मानसिक आघाताचे वर्णन करताना, “त्याच्या जाण्याने आयुष्य अर्थहीन झाले आहे, आणि ते दुःख आता सहन होत नाही,” असे नमूद केले आहे.
पोलिसांनी तपासादरम्यान उभे राहिलेले तर्कवितर्क व अपवाद यावर यामुळे पूर्णविराम मिळाला आहे. ही आत्महत्या कोणत्याही अन्य घटकांमुळे झालेली नसून मानसिक तणावातून उचललेले टोकाचे पाऊल असल्याचे स्पष्ट झाले आहे.