(खेड)
मिर्ले नं. १ शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक समिती शाखा खेडचे माजी अध्यक्ष व विद्यमान सल्लागार, तसेच तिसंगी गावचे भूमिपुत्र अजित लक्ष्मण भोसले यांचा सेवापूर्ती सोहळा बिजघर नं. १ शाळेत मोठ्या उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य सचिन धाडवे, पंचायत समिती सदस्य महेंद्र भोसले, अखिल भारतीय मराठा स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष सदानंद राव भोसले, खोपीचे शिक्षणविस्तार अधिकारी सुनील वरेकर, तिसंगी केंद्रप्रमुख महेंद्र जाधव, केंद्रप्रमुख संघटनेचे अध्यक्ष सुरेश आखडमल, केंद्रप्रमुख सदाशिव राठोड, बिजघर गावच्या सरपंच शुभांगी भोसले यांच्यासह विविध शैक्षणिक, सामाजिक व ग्रामस्तरावरील मान्यवर उपस्थित होते. तसेच मिर्ले व तिसंगी केंद्रातील सर्व शिक्षक-शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांनी अजित भोसले यांच्या दीर्घ शैक्षणिक कारकीर्दीचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी असलेली त्यांची प्रामाणिक तळमळ, विद्यार्थ्यांप्रती असलेले जिव्हाळ्याचे प्रेम आणि सेवाभावी वृत्ती यामुळे ते खेड तालुक्यात शिक्षक वर्गामध्ये अत्यंत लोकप्रिय ठरले, असे मत सर्व वक्त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमात सत्कार, मनोगत आणि भावनिक क्षणांनी भरलेला हा सेवापूर्ती सोहळा उपस्थितांसाठी संस्मरणीय ठरला.

