(देवरूख / सुरेश सप्रे)
देवरूख पंचायत समितीत तब्बल ३३ वर्षांनंतर सत्तांतर घडले आहे. शिवसेनेतील फूट आणि बदललेल्या राजकीय समीकरणांचा फटका उबाठा सेनेला बसला असून महायुतीने १० जागांवर विजय मिळवत सत्ता हस्तगत केली आहे. उबाठा सेनेला केवळ ४ जागांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे आता सभापतीपद कोणाकडे जाणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
या निवडणुकीत मतदारांनी अनेक प्रस्थापित नेत्यांना घरचा रस्ता दाखवला. माजी आमदार सुभाष बने, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व संपर्क प्रमुख राजू महाडीक, माजी सभापती जया माने आणि सहदेव बेटकर यांना मतदारांनी अनपेक्षित धक्का दिला. या निकालामुळे या नेत्यांचे राजकीय भवितव्यही अडचणीत आले आहे.
धामापूरमार्गे संगमेश्वर जिल्हा परिषद गटात उबाठाकडून रिंगणात उतरलेले सहदेव बेटकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे सुशिल भायजे यांनी पराभव केला. उबाठाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या कडवई गटात तिरंगी लढतीत उबाठाचे आक्रमक नेतृत्व, माजी जि.प. उपाध्यक्ष संतोष थेराडे यांनी भाजप तालुकाध्यक्ष विनोद म्हस्के यांचा पराभव केला.
कसबा (संगमेश्वर गट), जो १९९२ पासून राजू महाडीक यांचा बालेकिल्ला मानला जात होता, तेथे मोठा उलटफेर पाहायला मिळाला. शिवसेनेकडून उमेदवार असलेल्या रचना महाडीक यांना उबाठाच्या नवख्या विशाखा कुवळेकर यांनी थेट लढतीत पराभूत केले. उबाठाची संघटनात्मक ताकद तसेच कुणबी आणि मुस्लिम घटकांच्या पाठिंब्यामुळे महाडीकांचा अभेद्य गड ढासळला.
मुचरी गटात महायुतीकडून माजी जि.प. सदस्या माधवी गीते यांनी उबाठाच्या उच्च शिक्षित व आक्रमक प्रतिमेच्या ललिता तांबे यांचा पराभव केला. कोसुंब गटातील अत्यंत प्रतिष्ठेच्या लढतीत भाजपाचे प्रमोद अधटराव यांनी माजी जि.प. अध्यक्ष रोहन बने यांचा पराभव करत मागील पराभवाचा बदला घेतला.
साडवली गटात भाजपच्या रुपाली कदम यांची कडवी झुंज अपयशी ठरली आणि उबाठाच्या नेहा माने विजयी झाल्या. दाभोळे गटात महायुतीचे विलास चाळके यांनी वंचित बहुजन आघाडीच्या विरश्री बेटकर यांचा पराभव केला. धामापूर गणात भाजपाचे महेश जड्यार यांनी उबाठाच्या अजय चव्हाण यांना हरवले.
इतर गणांमध्येही चुरशीच्या लढती पाहायला मिळाल्या. काही ठिकाणी निसटते विजय तर काही ठिकाणी एकतर्फी निकाल लागले. कोंडगाव गणात उबाठाचे विद्यासागर तांदळे यांनी माजी सभापती जयसिंग माने यांचा पराभव करत इतिहास रचला.
एकूण निकाल पाहता पंचायत समितीत शिवसेना ४, राष्ट्रवादी काँग्रेस ४ आणि भाजप २ अशा जागा महायुतीच्या पारड्यात गेल्या आहेत. महायुतीने दहा सदस्य निवडून आणत देवरूख पंचायत समितीवरील उबाठा सेनेची ३३ वर्षांची सत्ता संपुष्टात आणली आहे. आता नव्या नेतृत्वाकडून तालुक्याला कोणती दिशा मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

