( संगमेश्वर / प्रतिनिधी )
व्यापारी पैसा फंड संस्थेने परिसरातील गोरगरीब मुलांना १९२९ साली शिक्षणाची दारं खुली करुन मोठी क्रांती केली आहे. याच्या जोडीला आता कला क्षेत्रात भरारी घेत उभारलेल्या भव्य कलादालनातील एकापेक्षा एक सुंदर कलाकृती पाहून थक्क व्हायला होते, असे प्रतिपादन संगमेश्वरचे पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण यांनी केले.
संगमेश्वर पोलीस ठाण्यातर्फे आज पैसा फंड प्रशालेतील विद्यार्थ्यांना विविध शस्त्रे आणि त्या विषयीची सविस्तर माहिती सांगण्यासाठी पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण प्रशालेत आले होते. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपिठावर संस्था सचिव धनंजय शेट्ये, संस्था सदस्य रमेश झगडे, छायाचित्रकार मीनार झगडे, पर्यवेक्षक प्रकाश दळवी, पो. हे. कॉ. किशोर जोयशी, पो कॉ. कुणाल घोलप, अमोल बंडगर, सचिन जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
पोलिसांकडे असणारी शस्त्रे कशा प्रकारची असतात, त्यांना कोणत्या नावाने ओळखलं जातं, या शस्त्रास्त्राचा मारा किती लांबपर्यंत जातो, अशा प्रकारची सर्व माहिती पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण, पो.कॉ. कुणाल घोलप, अमोल बंडगर यांनी विद्यार्थ्यांना सांगितली. यावेळी विद्यार्थ्यांनी ही शस्त्रे हाताळून देखील पाहिली. तसेच विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या शंकांचे यावेळी पोलिसांनी निरसन केले.
यावेळी पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी पैसा फंडचा कलावर्ग आणि कलादालनाला भेट दिली. कलादालनातील कलाकृती पाहून आपल्याला आपल्या शालेय जीवनातील कला शिक्षकांची आठवण झाल्याचे पो. नि. चव्हाण यांनी यावेळी नमूद केले. विद्यार्थ्यांच्या कलेला प्रोत्साहन देण्यासाठी पैसा फंड प्रशाला जे अभिनव प्रयोग राबवत आहे, त्याचे त्यांनी कौतुक केले.

