(चिपळूण /प्रतिनिधी)
चिपळूण तालुक्यातील पाचाड गावात गुरांच्या गोठ्यात तब्बल आठ ते नऊ फूट लांबीचा अजगर आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. स्थानिक ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे आणि वन विभागाच्या तात्काळ प्रतिसादामुळे हा अजगर सुरक्षितपणे पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आला.
ही घटना बुधवार, २० ऑगस्ट रोजी घडली. पाचाड येथील रहिवासी सहदेव चिले यांच्या गुरांच्या गोठ्यातील माळ्यावर ठेवलेल्या पेंढ्यांमध्ये हा महाकाय अजगर लपलेला दिसला. एवढा मोठा साप पाहताच ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, प्रसंगावधान राखत श्री. चिले यांनी तातडीने वन विभागाशी संपर्क साधला.
माहिती मिळताच वन परिक्षेत्र अधिकारी एस. एस. खान यांच्या नेतृत्वाखालील पथक पाचाड येथे दाखल झाले. पथकात वनरक्षक राहुल गुंठे, वाहनचालक नंदकुमार कदम आणि सर्पमित्र प्रथमेश पवार यांचा समावेश होता. या पथकाने काळजीपूर्वक बचावकार्य हाती घेतले. सर्पमित्र पवार यांनी कौशल्यपूर्ण हाताळणी करत अजगराला सुरक्षितपणे पकडले. सुमारे आठ ते नऊ फूट लांबीच्या या अजगराची तपासणी करून तो पूर्णपणे सुस्थितीत असल्याची खात्री वन विभागाने केली. त्यानंतर त्याला पुन्हा जंगलात सोडण्यात आले. वन विभागाच्या या तातडीच्या आणि प्रभावी कारवाईमुळे ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास टाकला.
या संपूर्ण कारवाईचे मार्गदर्शन विभागीय वन अधिकारी सौ. गिरिजा देसाई आणि सहाय्यक वनसंरक्षक (चिपळूण) यांनी केले. ग्रामस्थांनी वन विभागाचे आणि सर्पमित्रांचे मनःपूर्वक आभार मानले.

