( मुंबई )
अन्यायकारक पद्धतीने काढण्यात आलेल्या ई-चलानबाबत राज्य सरकार सकारात्मक निर्णय घेईल, तसेच वाहतूकदारांच्या विविध प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी येत्या ५ तारखेला परिवहन आयुक्तांसोबत पोलीस प्रशासन आणि वाहतूकदार संघटनांच्या प्रतिनिधींची संयुक्त बैठक आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध वाहतूक संघटनांनी पुकारलेले आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यातील विविध वाहतूकदार संघटनांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर तसेच संबंधित पोलीस प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मंत्री सरनाईक म्हणाले की, ई-चलानच्या मुद्द्यावर वाहतूकदारांच्या भावना अत्यंत तीव्र आहेत. अनेक वेळा पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांवरही आकसपूर्ण पद्धतीने ई-चलान काढले जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. तसेच, प्राधिकृत अधिकाऱ्यांच्या ऐवजी त्यांची अनुमती न घेता काही कर्मचारी ई-चलान काढत असल्याचे प्रकारही समोर आले आहेत. हे प्रकार पूर्णपणे अन्यायकारक असून यापुढे केवळ प्राधिकृत अधिकाऱ्यांनीच ई-चलानची कारवाई करावी, असे कडक निर्देश संबंधित यंत्रणेला देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यापूर्वी अन्यायकारकरीत्या काढण्यात आलेल्या ई-चलान रद्द करण्याबाबत सरकार सकारात्मक भूमिका घेत असल्याचेही मंत्री सरनाईक यांनी सांगितले. येत्या ५ तारखेला होणाऱ्या बैठकीत वाहतूकदारांच्या सर्व तक्रारी आणि मागण्यांवर सविस्तर चर्चा करून न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन देत, तोपर्यंत वाहतूकदार संघटनांनी आपले आंदोलन स्थगित करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
या बैठकीकडे राज्यभरातील वाहतूकदारांचे लक्ष लागले असून, ई-चलानप्रकरणी ठोस निर्णय होणार का, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

