( जाकादेवी / वार्ताहर )
रत्नागिरी तालुक्यातील जयगड–निवळी (मुख्य रस्ता १६४) मार्गावरील ठिकठिकाणी पडलेले धोकादायक खड्डे अखेर बुजवण्याचे काम सुरू झाले आहे. भाजपा तालुकाध्यक्ष प्रतिक देसाई व तालुका कार्यकारिणी सदस्य ऋषिकेश उर्फ बंटी सुर्वे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केलेल्या तक्रारीनंतर प्रशासनाने तातडीने ही कारवाई हाती घेतली.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याने अपघाताचा धोका वाढला होता. तक्रार प्राप्त होताच उपविभागीय अधिकारी कार्यालय व सार्वजनिक बांधकाम उपविभाग, रत्नागिरी यांनी तत्परतेने काम सुरू केले. सध्या डबर टाकून खड्डे बुजवले जात असून, पावसाळा कमी झाल्यावर या खड्ड्यांवर डांबरीकरण करून कायमस्वरूपी दुरुस्ती केली जाणार आहे, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते ऋषिकेश उर्फ बंटी सुर्वे यांनी दिली.
खड्डे बुजवण्याचे काम सुरू झाल्याने वाहनचालक व प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे. जाकादेवी–खालगाव पंचक्रोशीपासून निवळी–जयगड परिसरात कोणतीही अपघातजन्य किंवा नैसर्गिक अडचण निर्माण झाल्यास युवा नेते प्रतिक देसाई व बंटी सुर्वे यांची टीम तत्परतेने धावून जाऊन मदत पुरवत असते.

