(मुंबई)
नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी नवी मुंबईतला हादरवून टाकलेली एक घटना घडली होती. कामोठे सेक्टर 6, मधील ड्रीम्स सोसायटीतील एका घरातून गॅसचा वास येत असल्याने, तेथील नागरिकांनी पोलिसांना माहिती दिल्यावर दरवाजा उघडल्यावर घरात आई आणि मुलाचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी अग्निशमन जवानांच्या मदतीने दरवाजा उघडून आत पाहिले असता, घरात गीता भूषण जग्गी, वय 70 वर्ष, व त्यांचा मुलगा जितेंद्र भूषण जग्गी, वय 45 वर्ष, या दोघांचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी केलेल्या पंचनाम्यात दोघांच्या मृतदेहावर मारहाणीच्या खुणा व वळ दिसून आल्याने ही हत्या असल्याचा प्रथमदर्शनी निष्पन्न झालं. त्यानुसार तपासाच्या दृष्टीने विविध पथके या हत्येचा तपास करत होते. पोलिसांनी गुप्त बातमीदार व तांत्रिक तपासाच्या आधारावर 24 तासात दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
जितेंद्रच्या अंगावर मारल्याचे व्रण आढळल्याने ही हत्या असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. कामोठे पोलिसांनी प्रथम अज्ञात आरोपीविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या तपासासाठी पोलिसांनी अनेक पथके तयार केली होती. दरम्यान तांत्रिक तपास व साक्षीदारांकडे केलेल्या चौकशीत संज्योत मंगेश दोडके यांच्या बद्दल माहिती पोलिसांना मिळाली. या पथकाने सोसायटीचे सीसीटीव्ही फुटेज चेक करून संज्योत मंगेश दोडके ( वय १९ वर्ष), शुभम महिंद्र नारायणी (वय १९ वर्ष) यांना उलवे परिसरातून ताब्यात घेतले होते.
आरोपींनी दिलेल्या कबुली जबाबानुसार मृत जितेंद्र याच्याशी त्यांची गेल्या दीड वर्षांपासून मैत्री होती. त्याने थर्टी फर्स्टच्या पार्टीसाठी दोघांना आपल्या घरी बोलावले होते. तिघांनी मिळून रात्री दारू प्यायली होती. दारूच्या नशेत जितेंद्र याने शुभम आणि संज्योत यांच्याकडे समलिंगी संबंध प्रस्थापित करण्यासाठी आग्रह धरला. याचा दोघांनी विरोध केला. मात्र जितेंद्र काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हता, तो समलैंगिक संबंधासाठी हट्ट करू लागला. यामुळे चिढून शुभम नारायणी याने लाईटचा एक्सटेंशन बोर्ड जितेंद्रच्या डोक्य़ात घातला. घाव वर्मी बसल्याचे त्याचा जागीच मृत्यू झाला.
त्यानंतर संज्योत दोडके याने जितेंद्रची ७० वर्षीय आई गीता जग्गी यांचा गळा आवळून त्यांना ठार मारले. हत्येचे प्रकरण बाहेर येऊन नये म्हणून त्यांनी मृतांचे मोबाईल फोन, पाकीट, टॅब आणि घरातील दागिने चोरून नेले. तसेच घरातील एलपीजी गॅस ऑन करून गॅस लिक झाल्याचा बनाव केला. मात्र पोलिसांनी तांत्रिकदृष्ट्या तपास करत आरोपींना २४ तासात जेरबंद केले.
समलिंगी संबंध म्हणजे काय
लैंगिकता हि प्रत्येक व्यक्तिगणिक वेगळी असते. प्रत्येक व्यक्तीचे काही लैंगिक अग्रक्रम असतात. पुरुषाला स्त्रीविषयी वाटणारे आकर्षण व स्त्रीला पुरुषाविषयी वाटणारे आकर्षण(भिन्नलिंगी आकर्षण) हे समाजाच्या सर्व घटकाद्वारे नैसर्गिक मानण्यात आले आहे. समान लिंग असणाऱ्या दोन व्यक्तींच्या लैंगिक संबंधाना समलिंगी म्हणतात. पुरुषांचे पुरुषांशी संबंध असतील तर त्यांना गे म्हणतात व स्त्रीचे स्त्रीशी संबंध असतील तर त्यांना लेस्बिअन म्हणतात. समलिंगी संबंधातून मुल जन्माला घालता येत नाही त्यामुळे बहुसंख्य लोकांच्या दृष्टीकोनातून समलिंगी संबंध अनैसर्गिक मानण्यात आले आहेत.
समलिंगी आकर्षण हे प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. साहित्य, शिल्प, कला या प्रकारच्या माध्यमातून ते आढळून येत. पण त्याकाळी याविषयी समाजात खुलेपणाने बोलले जात नसे. एकोणिसाव्या शतकात मानसशास्त्रीय दृष्टीकोनातून समलिंगी संबंध अनैसर्गिक मानले जायचे. अमेरिकन मानसशास्त्र संस्थेने वैद्यकीय संशोधन करून समलैंगिकतेची व्याख्या “लैंगिकतेच्या विविध अविष्कारापैकी एक” अशी केली आहे. समलिंगी असणे ही शरीराची व मनाची एक अवस्था आहे.
समलिंगी असण्याची काही कारणे :
१. शास्त्रज्ञांच्या मते आनुवंशिक व हार्मोनिक बदलांमुळेसुद्धा एखादी व्यक्ती समलैंगिक असू शकते.
२. तारुण्यात असणारी मुले भावनिक व मानसिक आधारासाठी समलिंगी संबंधांचा आधार घेतात.
३. महाविद्यालयीन जीवनात लैंगिक प्रयोग करून बघण्याचे विलक्षण कुतूहल असते. अशावेळी भिन्नलिंगी जोडीदार न मिळाल्यास समलिंगी संबंध ठेवले जातात व नकळत पुढे त्याची सवय होती.
४. लग्न झाल्यावर कामेच्छा पूर्ण न झाल्यास व्यक्ती दुसऱ्या जोडीदाराचा शोध घेतात. भिन्नलिंगी जोडीदार न मिळाल्यास अशा व्यक्ती समलिंगी व्यक्तीशी संबंध करायलाही घाबरत नाहीत.