हृदयविकाराचा झटका ही एक गंभीर वैद्यकीय आपत्कालीन स्थिती असून, तो केवळ वृद्धांपुरता मर्यादित राहिलेला नाही. आजकाल तरुणांनाही हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. खराब जीवनशैली, अयोग्य आहार, वाढता तणाव आणि व्यायामाचा अभाव यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. अनेकदा लोकांना अचानक हार्ट अटॅक आल्याचे दिसते, मात्र त्याआधी शरीर काही महत्त्वाचे संकेत देत असते. या झटक्याच्या काही दिवस किंवा काही तास आधी शरीर सावध करणारी लक्षणं देत असते. योग्य वेळी ही लक्षणं ओळखली, तर जीव वाचवता येणे शक्य आहे.
हार्ट अटॅक येण्याच्या 2 तास आधीची लक्षणं
- छातीत तीव्र वेदना; छातीच्या मधोमध किंवा डाव्या बाजूला दाब, जळजळ, घट्टपणा किंवा पिळवटल्यासारखा त्रास जाणवतो.
- शरीराच्या इतर भागात वेदना : हात, जबडा, मान, पाठ किंवा पोटात वेदना होतात. या वेदना हळूहळू पसरतात.
- श्वास घेण्यास त्रास: अगदी थोड्या हालचालींमध्येही दम लागणे हे हृदयाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करू शकते.
- अचानक घाम येणे : कोणतीही हालचाल न करता किंवा थंड वातावरणातही अतीप्रमाणात घाम येणे, हे हार्ट अटॅकचे महत्त्वाचे लक्षण आहे.
- चक्कर येणे आणि अशक्तपणा: अशक्त वाटणे, भोवळ येणे, डोकं हलकं वाटणे ही लक्षणंही दुर्लक्षित करू नयेत.
हृदयविकाराचा झटका येण्याआधी अनेकांना डाव्या हातात तीव्र वेदना जाणवतात. ही वेदना डाव्या खांद्यापासून सुरू होऊन संपूर्ण हातात पसरू शकते. काही प्रकरणांमध्ये वेदना मानेपर्यंत आणि पाठीपर्यंतही पोहोचू शकते. जर ही वेदना कोणत्याही स्पष्ट कारणाशिवाय सतत जाणवत असेल, तर हे हृदयासंबंधी समस्या असल्याचे लक्षण असू शकते.
हृदयविकाराशी पोटदुखीचा संबंध असू शकतो हे अनेकांना माहित नसते. काही लोकांना हार्ट अटॅक येण्याच्या काही दिवस आधी सतत अपचन, गॅस, छातीत जळजळ किंवा उलटी होण्याची समस्या जाणवते. विशेषतः मधुमेह असलेल्या रुग्णांमध्ये हे लक्षण अधिक दिसून येते. त्यामुळे वारंवार पोटाशी संबंधित समस्या जाणवत असतील, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.
हार्ट अटॅक येण्याच्या आधीच्या आठवड्यात दिसणारी लक्षणं (Circulation जर्नलनुसार)
- 71% महिलांनी हार्ट अटॅक येण्याआधी तीव्र थकवा जाणवण्याचे सांगितले.
- 48% महिलांना झोपेच्या समस्या होत्या.
- काहींना छातीत जळजळ, पचनतंत्रातील अडचणी, भूक मंदावणे यासारखी लक्षणं जाणवली.
इतर लक्षणंही दुर्लक्षित करू नयेत!
- अपचन, छातीत किंवा पोटात जळजळ
- गॅस व पोट फुगणे
- पायांमध्ये सूज
- दृष्टीमध्ये बदल, मनःस्थिती अस्थिर होणे
- हात पाय गारसर होणे किंवा मुंग्या येणे
हार्ट अटॅकची संभाव्य कारणं
- लठ्ठपणा, मधुमेह
- उच्च रक्तदाब, कोलेस्टेरॉल
- धूम्रपान आणि मद्यपान
- जास्त तेलकट, साखरयुक्त, प्रोसेस्ड अन्नाचा आहार
- शारीरिक हालचालींचा अभाव
हृदय निरोगी ठेवण्यासाठी काय करावे?
- संतुलित आहार आणि नियमित व्यायाम
- धूम्रपान व मद्यपान बंद करा
- वजन, रक्तदाब, साखर आणि कोलेस्टरॉल नियंत्रणात ठेवा
- वेळच्यावेळी तपासणी करा
- तणाव टाळा आणि पुरेशी झोप घ्या
हृदयविकाराचा झटका अचानक येत नाही, तो हळूहळू अंगात उतरतो. शरीर वेळोवेळी संकेत देत असते, फक्त आपण ते ओळखणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे कोणतीही लक्षणं आढळल्यास गोंधळून न जाता तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या.

