आजच्या घडीत स्त्रियांसाठी स्तनाचा कर्करोग (Breast Cancer) हे एक गंभीर आणि वाढते आरोग्यसंकट बनले आहे. दरवर्षी जगभरात लाखो महिलांना या आजाराचा सामना करावा लागतो. भारतातही या आजाराचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. सर्वात चिंताजनक बाब म्हणजे या आजाराचे निदान अनेकदा उशिरा होते, जेव्हा उपचार करणे अधिक अवघड बनते.
स्तनाच्या कर्करोगामागची प्रमुख कारणे
🔹 जीवनशैली आणि आहार
- सतत जंक फूडचे सेवन
- व्यायामाचा अभाव
- मद्यपान व धूम्रपानाची सवय
- झोपेचा अभाव
- वाढलेले वजन व तणाव
हे सर्व घटक कर्करोग होण्याच्या शक्यतेत वाढ करतात.
🔹 अनुवंशिकता (Genetics)
डॉक्टरांनीही स्पष्ट केले आहे की, जर तुमच्या कुटुंबातील कोणत्याही महिलेला, जसे की आजी, आई किंवा बहीण यांना स्तनाचा कर्करोग झाला असेल तर अशावेळी अनुवंशिकता म्हणून आपल्यालाही स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका असतो. याचा थेट संबंध नाही, परंतु हा आजार तुमच्या शरीरात कर्करोग निर्मितीचे घटक वाढवू शकतो, ज्यामुळे धोका निर्माण होऊ शकतो. हे केवळ वृद्धापकाळातच नाही तर 30 ते 35 वयोगटातील महिलांमध्ये देखील दिसून येत आहे.
स्तनाच्या कर्करोगाची चेतावणी देणारी लक्षणे
- स्तनावर गाठ जाणवणे
- स्तनाचा किंवा निपलचा रंग, आकार बदलणे
- निपलमध्ये कोमलता, वेदना किंवा स्त्राव
- स्तनातून रक्त, पाणी किंवा पिवळसर द्रव बाहेर येणे
- निपल आत खेचली जाणे
- स्तनाजवळ फोड, पुरळ किंवा व्रण येणे
- सतत दुखत राहणे
ही सर्व लक्षणे दुर्लक्षित करू नयेत. वेळेत निदान झाल्यास उपचार सोपे आणि प्रभावी ठरतात.
स्तनाचा कर्करोग टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी
- स्वत:ची नियमित तपासणी: पाळीनंतर ५व्या-६व्या दिवशी स्तनावर हात फिरवून गाठ आहे का हे पाहावे.
- मॅमोग्राफी: ४० वर्षांनंतर दरवर्षी मॅमोग्राफी करून घ्यावी.
- स्तनपान: बाळाला स्तनपान केल्यास कर्करोगाचा धोका कमी होतो.
- व्यसन टाळा: मद्यपान व धूम्रपानाचे सेवन टाळा.
- गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर मर्यादित ठेवा.
- सक्रिय जीवनशैली आणि संतुलित आहार पाळावा.
- वजनावर नियंत्रण ठेवा, विशेषतः पाळीनंतर वाढणारे वजन.
पुरुषांनाही असतो स्तनाचा कर्करोग?
स्तनाचा कर्करोग हा आजार बहुतेक वेळा स्त्रियांमध्येच दिसतो, पण पुरुषांनाही स्तनाचा कर्करोग होऊ शकतो. त्यामुळे लक्षणे आढळल्यास त्वरित तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
स्तनाचा कर्करोग टाळता येणारा आहे, वेळीच निदान केल्यास बरा होणारा आजार आहे. दर ३० स्त्रियांमध्ये १ स्त्रीला स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता असते, हे लक्षात घेऊन प्रत्येक महिलेनं स्वतःच्या आरोग्याची जबाबदारी घेतली पाहिजे. लाज न बाळगता, लक्षणे जाणवतानाच डॉक्टरांशी संपर्क साधावा, कारण प्रत्येक गाठ म्हणजे कर्करोग असतोच असं नाही, पण धोका नाकारता येत नाही.