हिंदू धर्म आणि वास्तुशास्त्रात स्वयंपाकघराला घराचे हृदय मानले जाते. हे केवळ अन्न शिजवण्याचे ठिकाण नसून, कुटुंबाच्या आरोग्य, सुख-शांती आणि आर्थिक समृद्धीशी थेट जोडलेले पवित्र स्थान आहे. पौराणिक मान्यतेनुसार देवी अन्नपूर्णा स्वयंपाकघरात वास करतात, त्यामुळे येथे असलेल्या प्रत्येक वस्तूचा सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम संपूर्ण घरावर होत असतो.
वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात काही गोष्टी अशा आहेत, ज्या कधीही पूर्णपणे संपवू नयेत. या वस्तू रिकाम्या झाल्यास नकारात्मक ऊर्जा वाढते, वास्तुदोष निर्माण होतो आणि घरातील समृद्धी थांबते, असे मानले जाते. चला जाणून घेऊया स्वयंपाकघरातील त्या तीन महत्त्वाच्या वस्तू कोणत्या आहेत.
1. हळद
स्वयंपाकघरातील हळदीचा डबा कधीही रिकामा नसावा. ज्योतिषशास्त्रानुसार हळद हा गुरु ग्रहाशी संबंधित आहे. गुरु ग्रह सन्मान, संपत्ती, ज्ञान आणि सौभाग्याचे प्रतीक मानला जातो. वास्तुशास्त्र सांगते की, जर हळद पूर्णपणे संपली तर गुरुदोष आणि वास्तुदोष निर्माण होऊ शकतो, ज्याचा थेट परिणाम आर्थिक स्थितीवर होतो. त्यामुळे हळद संपण्याआधीच नवी हळद आणावी. तसेच हळद कधीही शेजाऱ्यांकडे मागू नये किंवा कोणालाही देऊ नये, कारण यामुळे कर्जबाजारीपणाची शक्यता वाढते, अशी मान्यता आहे. हळद संपणे म्हणजे घरातील समृद्धी धोक्यात येणे, असे वास्तुशास्त्र स्पष्टपणे सांगते.
2. मीठ
मीठाशिवाय स्वयंपाक अपूर्ण मानला जातो. वास्तुशास्त्रात मिठाला विशेष महत्त्व असून ते राहू-केतूचा नकारात्मक प्रभाव कमी करतं, असं मानलं जातं. समुद्रातून मिळत असल्यामुळे मिठाला लक्ष्मीचा भाऊ असेही संबोधले जाते. मिठाचा डबा पूर्णपणे रिकामा झाल्यास घरात कलह, मानसिक तणाव आणि आर्थिक अडचणी वाढू शकतात. त्यामुळे मीठ संपण्याआधीच नवे मीठ आणावे. विशेष म्हणजे, सायंकाळी मिठाची देवाण-घेवाण करू नये, अन्यथा आर्थिक स्थिती खालावते, अशी वास्तुशास्त्रात नोंद आहे. प्राचीन मान्यतेनुसार मीठ सांडणे किंवा मीठ संपू देणे अशुभ मानले जाते.
3. तांदूळ
तांदळाला ‘अक्षता’ म्हटले जाते, म्हणजेच कधीही न संपणारा. तांदूळ हा शुक्र आणि चंद्र ग्रहाशी संबंधित असून भौतिक सुख, ऐश्वर्य, प्रेम आणि समृद्धीचे प्रतीक आहे. भारतीय संस्कृतीत तांदळाला धार्मिक महत्त्व आहे. लग्नात अक्षता, आशीर्वाद, नववधूचे माप ओलांडणे अशा प्रत्येक शुभ कार्यात तांदूळ वापरला जातो. वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरातील तांदूळ पूर्णपणे संपल्यास शुक्रदोष निर्माण होतो, ज्यामुळे सुख-संपत्ती, शांती आणि आनंदात कमी होते. देवी अन्नपूर्णेचे आशीर्वाद टिकवून ठेवण्यासाठी तांदळाचे भांडे कधीही रिकामे ठेवू नये, अशी स्पष्ट मान्यता आहे.
वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरातील हळद, मीठ आणि तांदूळ या तीन वस्तू कधीही संपू देऊ नयेत. या वस्तू केवळ स्वयंपाकासाठीच नाहीत, तर त्या घरातील सकारात्मक ऊर्जा, समृद्धी आणि सौभाग्याचे प्रतीक मानल्या जातात. योग्य काळजी घेतल्यास वास्तुदोष टाळता येतो आणि घरात सुख-शांती नांदते.
(टीप: वरील माहिती धार्मिक व पारंपरिक मान्यतांवर आधारित आहे.)

