(मुंबई)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी नगरविकास विभागाशी संबंधित विषयाच्या बोलावलेल्या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा दांडी मारली. यापूर्वीही अनेक बैठकांना गैरहजर राहिलेल्या शिंदे यांनी बुधवारीही फडणवीस यांनी बोलावलेल्या बैठकीकडे पाठ फिरवल्याने त्यांची नाराजी कायम असल्याची चर्चा आहे.
एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खाते आहे. या खात्याशी संबंधित नाशिक, पुणे, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या ४ शहरांच्या महानगर विकास प्राधिकरणाची बैठक बुधवारी सह्याद्री अतिथीगृह येथे देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीच्या आधी दुपारी १२.३० वाजता नगरविकास विभागांतर्गत येणाऱ्या नाशिक महापालिका सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाबाबतही फडणवीस यांनी बैठक घेतली. या दोन्ही बैठका नगरविकास खात्याशी संबंधित होत्या. त्यामुळे नगरविकास मंत्री या नात्याने शिंदे यांनी बैठकीला उपस्थित राहणे अपेक्षित होते, मात्र या बैठकांना उपस्थित राहण्याऐवजी शिंदे यांनी कल्याणला मलंगगडच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. बैठकीत सहभागी होण्यासाठी एकनाथ शिंदे मलंगगडच्या कार्यक्रमाची वेळ मागेपुढे करू शकले असते, परंतु त्यांनी तसे केले नाही. त्यामुळे शिंदे अजूनही नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. याआधी एका मंत्रिमंडळ बैठकीलाही शिंदे गैरहजर होते. तसेच १०० दिवसांच्या आढावाच्या बैठकीकडेही त्यांनी पाठ फिरवली होती. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी बोलावलेल्या राज्यस्तरीय जिल्हा वार्षिक योजनेच्या बैठकीला एकनाथ शिंदे हजर होते.
मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत आपल्या खात्यात हस्तक्षेप होत असल्याबाबत शिंदे गटाच्या मंत्र्यांनी नाराजीचा सूर लावला होता. या नाराजीनंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदे यांच्याशी संबंधित खात्याची बैठक बोलवणे आणि त्याला शिंदेंनी दांडी मारणे म्हणजे महायुतीत विशेषतः शिंदे गट आणि भाजपमधील सत्तासंघर्ष अधिक तीव्र होत चालल्याचे संकेत मिळत आहेत. दरम्यान, नगरविकास विभागाशी संबंधित बैठकीला उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.