(कणकवली)
राज्याचे मंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी आज कणकवली शहरातील बाजारपेठेत सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर थेट धाड टाकत कारवाई केली. विशेष म्हणजे, ही कारवाई पोलिसांना कोणतीही पूर्वकल्पना न देता करण्यात आली, त्यामुळे प्रशासनात आणि परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बाजारपेठेतील ‘घेवारी’ नावाच्या नामचीन व्यक्तीचा मटका अड्डा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होता. याच ठिकाणी १२जण मटका घेताना राणेंच्या कारवाईत आढळून आले. मंत्री राणे यांनी घटनास्थळी पोहोचताच अड्ड्यावर थेट छापा मारला. त्यानंतर कणकवली पोलीसही घटनास्थळी दाखल झाले आणि पुढील कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली. यावेळी स्वत: घेवारी याच्यासह १२ जण मटका जुगाराच्या पावत्या, रोख रक्कम व लॅपटॉपवर व्हॉट्सॲपच्या माध्यमातून मटका स्विकारत असताना आढळून आले.
पालकमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर नितेश राणे यांनी स्वतः हजर राहून केलेली ही पहिलीच मोठी कारवाई आहे.
सध्या या धाडसत्राचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, राणेंच्या धडक कार्यशैलीची चर्चा राज्यभरात सुरू आहे. थेट कारवाईचा निर्णय घेतल्यामुळे कायदेशीर व प्रशासकीय पातळीवर याचे पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

