(दापोली)
मन, मेंदू आणि मनगट सक्षमीकरणासाठी सन २०१८ पासून पंचायत समिती दापोलीतर्फे राबविण्यात येत असलेला स्वप्नवत उपक्रम म्हणजे “व्हिजन दापोली”. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी या उपक्रमांतर्गत विविध शैक्षणिक कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडले जात आहेत.
या पार्श्वभूमीवर, सन २०२३-२४ व २०२४-२५ या शैक्षणिक वर्षांत शिष्यवृत्ती परीक्षा (चौथी, पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक), नवोदय परीक्षा आणि NMMS परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
हा सोहळा शनिवार, दि. ०२ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता माधव कोकणे सभागृह, ए. जी. हायस्कूल दापोली येथे पार पडणार असून, यावेळी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार केला जाणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी गणेश मंडलिक राहतील.
गटशिक्षणाधिकारी रामचंद्र सांगडे यांनी सर्व संबंधित शाळा व शिक्षकांना सूचना दिल्या आहेत की, यशस्वी विद्यार्थी सोहळ्यासाठी वेळेत उपस्थित राहतील, याची काळजी घ्यावी.