(दापोली)
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात पर्यटनासाठी आलेल्या एका कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथून दापोलीत फिरण्यासाठी आलेल्या १३ वर्षीय मुलीचा अचानक मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी, २७ डिसेंबर रोजी घडली.
आंचल मदन सकपाळ (वय १३) असे मृत मुलीचे नाव आहे. हे कुटुंब २५ डिसेंबर रोजी दापोली तालुक्यातील आंजर्ले परिसरात पर्यटनासाठी आले होते आणि तेथील एका रिसॉर्टमध्ये मुक्कामाला होते. गेल्या काही दिवसांत कुटुंबीयांनी दापोली परिसरात पर्यटनाचा आनंद घेतला होता. आज (शनिवारी) सकाळी परतीच्या प्रवासासाठी निघायचे असल्याने कुटुंबीयांनी आंचल हिला उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र ती प्रतिसाद देत नसल्याचे लक्षात आले.
कुटुंबीयांच्या निदर्शनास आले की, तिचे शरीर थंड झाले होते आणि दातखिळी बसलेली होती. घाबरलेल्या कुटुंबीयांनी तत्काळ स्थानिकांच्या मदतीने आंचल हिला आंजर्ले येथील जवळच्या रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी पुढील उपचारांसाठी तिला दापोली उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यास सांगितले.
दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून आंचल हिला मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.

