(राजापूर)
एस.टी. बस प्रवासादरम्यान चहात गुंगीचं औषध देऊन ५० वर्षीय महिलेचे दागिने चोरल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना १२ ऑगस्ट रोजी दुपारी तळेरे ते राजापूर मार्गावर घडली असून, अज्ञात इसमाविरोधात राजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी सौ. बीसाबी अल्लाबक्ष मकानदार (वय ५०, रा. गडहिंग्लज, सध्या रत्नागिरी) या मालवणहून रत्नागिरीकडे एस.टी. बसने प्रवास करत होत्या. बसमध्ये त्यांच्या शेजारी बसलेल्या एका अनोळखी इसमाने तळेरे एस.टी. स्टँड येथे त्यांना चहा दिला. तो चहा प्यायल्यावर बीसाबी मकानदार यांना गुंगी आली. या संधीचा फायदा घेत त्या अनोळखी इसमाने त्यांचे दागिने चोरून नेले.
प्रवासा दरम्यान प्रकृती बिघडल्याने बीसाबी मकानदार यांना रत्नागिरी सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचारानंतर प्रकृती सुधारली असता त्यांनी घरी परतल्यावर पोलिसांना घटनेची माहिती दिली. प्रथम हा गुन्हा कणकवली पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आला होता. मात्र, घटना क्षेत्र राजापूर तालुक्यातील असल्याने प्रकरण पुढे वर्ग करून गु.र. नं. १५४/२०२५, भा. दं. सं. २०२३ चे कलम १२३, ३०५ (ब) अन्वये राजापूर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आले आहे. राजापूर पोलिसांनी अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

