(मंडणगड)
तालुक्यातील दापोली फाटा येथे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या (महावितरण) ३३/११ केव्ही मंडणगड उपकेंद्रालगत असलेल्या शासकीय जमिनीवरून अज्ञात इसमांसह तिघांनी खैराच्या झाडांची चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मंडणगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार गणेश विठ्ठल चौगुले (वय ४८, यंत्रचालक, महावितरण उपकेंद्र दापोली फाटा) हे २० ऑगस्ट रोजी ड्युटीवर असताना आरोपींनी उपकेंद्रालगतच्या सर्व्हे नं. २/ल या शासकीय जमिनीत प्रवेश केला. त्याठिकाणी असलेल्या खैरांच्या लहान-मोठ्या झाडांपैकी ४ ते ५ झाडे त्यांनी परवानगीशिवाय व फसवणुकीच्या हेतूने तोडून नेल्याचे चौगुले यांच्या लक्षात आले.
या चोरीत सुमारे ७ हजार रुपयांचा ऐवज लंपास झाला आहे. पोलिसांनी शिवाजी चंदर जाधव (रा. भिंगळोली, आदिवासीवाडी, ता. मंडणगड) व दोन अज्ञात इसमांवर गु.र. नं. ४२/२०२५, भा. दं. सं. २०२३ चे कलम ३०३(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याबाबत मंडणगड पोलिस तपास करत आहेत.

