(राजापूर)
स्वीमिंग टँक जवळ खेळत असताना अचानक तोल जाऊन पाण्यात पडलेल्या सहा वर्षांच्या मुलाला त्याच्या सोबत खेळणाऱ्या आठ वर्षांच्या मुलाने मोठ्या धाडसाने पाण्याबाहेर काढत जीवदान दिले आहे. नील सुशांत पवार, (राह. वरचीपेठ, राजापूर) असे या धाडसी चिमुकल्याचे नाव असून एवढ्या लहान वयात नील याने दाखविलेल्या धाडसाचे, शौर्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
याबाबतची घटना अशी की, राजापूर तालुका बार असोसिएशनचे 6 वे फॅमिली गेट टू गेटदर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका रिसॉर्टमध्ये दि.26 जानेवारी रोजी पार पडले. या स्नेहसंमेलनासाठी राजापुरातील सर्व वकील आपल्या कुटुंबासमवेत त्या रिसॉर्टमध्ये गेले होते. सायंकाळी वकील मित्रांच्या स्नेहसंमेलनाचा कार्यकम सुरू असताना त्यांयासोबत गेलेली सर्व लहान मुले एका बाजूला खेळत होती. या मुलांपैकी ऍड.अभिषेक ढवळे यांचा सहा वर्षांचा मुलगा रूद्र आणि ऍड.सुशांत पवार यांचा आठ वर्षांचा मुलागा नील खेळत असताना जवळच असलेल्या स्वीमिंग पुलाजवळ गेले.
स्वीमिंग पुलाच्या काठावर बसून पाण्यात चेंडू तसेच पोहण्याची ट्यूब टाकत असताना रूद्र याचा अचानक तोल गेला आणि तो स्वीमिंग पुलमध्ये पडला. स्वीमिंग पुलमध्ये सुमारे पाच ते सहा फुट पाणी होते. त्यामुळे रूद्र पाण्यात गटांगळ्या खाऊ लागला. यावेळी काठावर असलेल्या नील याने क्षणाचाही विलंब न लावता काठावरून रूद्र याला हात देत पाण्याबाहेर खेचले. ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या ठिकाणी रूद्र आणि नील या दोघांव्यतिरिक्त कोणीही नव्हते. अगदी या दोघांचे आई-वडील आणि सर्व वकील स्नेहसंमेलनात व्यस्त होते. त्यांना जेव्हा ही घटना समजली तेव्हा त्यांचा सुध्दा थरकाप उडाला. रूद्रच्या आई-वडीलांसाठी आणि कुटुंबासाठी तर नील हा एखाद्या देवदुतापमाणे धावून आला होता.
वास्तविक नील याच्या वयाचा विचार करता रूद्र पाण्यात पडल्यानंतर नील देखील घाबरला असता, व तेथून पळून गेला असता तर मोठा अनर्थ घडला असता. मात्र नील याने समयसूचकता दाखवत अत्यंत धाडसाने रूद्र याला पाण्याबाहेर काढत जीवदान दिले आहे. नील सुशांत पवार हा वरचीपेठ येथील शाळेत इयत्ता तिसरीमध्ये शिकत आहे. एवढ्या लहान वयात त्याने दाखविलेल्या शौर्याचे शब्दांमधे वर्णन होऊ शकत नाही. नीलच्या रुपात प्रत्यक्ष स्वामी आमच्यासाठी धावून आले, अशा भावना रुद्रच्या कुटुंबीयांनी व्यक्त केल्या आहेत. संपूर्ण राजापूर तालुक्यातून या चिमुकल्या “सुपर हिरो”चे कौतुक होत आहे.