(मुंबई)
माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांची प्रकृती मागील काही काळापासून खालावली होती. अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. लघवीचा संसर्ग आणि स्नायूंमध्ये आकुंचन (cramps) यामुळे त्रस्त असलेल्या कांबळी यांच्या तपासणीत त्यांच्या मेंदूत रक्ताची गाठ आढळून आली होती. त्यानंतर त्यांच्यावर दोन आठवड्यांपर्यंत रुग्णालयात उपचार करण्यात आले.
सध्या विनोद कांबळी घरी आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असली, तरी अजूनही त्यांना चालणे आणि बोलणे कठीण जात आहे. त्यांच्यावर फिजिओथेरपीसह इतर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. त्यांच्या लहान भावाने, वीरेंद्र कांबळीने एका शोमध्ये विनोदच्या तब्येतीबाबत महत्त्वाचे अपडेट्स दिले.
वीरेंद्र म्हणाला, “तो आता घरी आहे. उपचार सुरू आहेत. त्याला बोलण्यात अडचण होते आहे आणि तो अजून चांगला चालू शकत नाही. मात्र त्याची तब्येत हळूहळू सुधारते आहे. तो एक चॅम्पियन आहे, आणि आम्हाला विश्वास आहे की लवकरच तो धावायला आणि मैदानावर यायला सुरुवात करेल.”
त्यांनी पुढे सांगितले की विनोदवर 10 दिवस पुनर्वसन (rehabilitation) उपचार झाले असून, संपूर्ण शरीर तपासणी, मेंदूचे स्कॅन आणि मूत्र चाचणीसह सर्व तपासण्या करण्यात आल्या आहेत. सर्व तपासण्यांचे रीपोर्ट चांगले आहेत आणि सध्या कोणतीही गंभीर समस्या नाही. तथापि, त्याची हालचाल मर्यादित असल्याने डॉक्टरांनी फिजिओथेरपीचा सल्ला दिला आहे.

