( संगमेश्वर / प्रतिनिधी )
संगमेश्वर उपकेंद्राला उच्चदाब निवळी तसेच आरवली उपकेंद्रातून ३३ केव्ही वीज वाहिनी द्वारे वीज पुरवठा केला जातो. सदर वीज वाहिनीवरून संगमेश्वर उपकेंद्रासह देवरुख साडवली व साखरपा अशी इतर तीन उपकेंद्रे आहेत व त्याद्वारे सुमारे साठ हजार वीज ग्राहकांना वीज पुरवठा केला जातो.
दिनांक १७ ऑगस्ट रोजी रात्री या दोन्ही लाईनवर फॉल्ट होऊन वीज पुरवठा खंडित झाला त्यामुळे त्यावर असलेल्या चारही उपकेंद्र उपकेंद्रातील सर्व वीज ग्राहक अंधारात गेले अथक प्रयत्नानंतर दिनांक १८ ऑगस्ट रोजी आरवली उपकेंद्रातून येणारी वरील फॉल्ट शोधून तो दुरुस्ती नंतर वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. तसेच निवळी वीज वाहिनी वरील फॉल्ट शोधण्यात आला. सदरचा फॉल्ट वांद्री मानसकोंड येथील एका पोलवर असल्याचे आढळून आले.
मागील दोन-तीन दिवसात झालेल्या प्रचंड पावसाने सदरचा पोल असलेल्या नदीपात्राजवळ आहे. नदीचा प्रवाह वेगाने होत असल्या कारणाने त्या पोल पर्यंत सुरक्षितरित्या पोहोचणे शक्य होत नव्हते. परंतु आरवली वाहिनी सणासुदीला बंद पडली तर पुन्हा तालुका अंधारात जाऊ शकतो. याची कल्पना असल्याने, सदर पोल पर्यंत पोहोचून फॉल्टी पिन बदलून वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना बोट सह एनडीआरएफ च्या जवानांच्या मदत मिळणेबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन ला कळविण्यात आले होते. परंतु याला वेळ लागणार असल्याने महावितरणच्या जनमित्रांनी स्वतः च खोल पाण्यात उतरून पोल पर्यंत पोहत जाऊन पोल वर चढून पिन इन्सुलेटर बदलण्याचा निर्णय घेतला.
नदीचे पात्र खोल असल्याने, सतत पाऊस पडत असल्याने व नदीचा प्रवाह वेगात असल्याने हे प्रचंड धोकादायक होते. परंतु संगमेश्वर तालुक्याला पुन्हा अंधारात जाऊ देणार नाही. हा निर्धार जनमित्र आणि अभियंत्यांनी केला असल्याने हा धोका पत्करला गेला. आणि जिगरबाज जनमित्र विलीन काष्टे, प्रतीक तांबे,किरण मोरे, रुपेश फेपडे,सचिन कुंभार यांनी लाइन फोरमन विजय आडविलकर यांच्या नेतृत्वाखाली रस्सी च्या साहाय्याने खोल पात्रात उतरून पुन्हा पोलवर चढून भर पावसात पिन इन्सुलेटर बदलला व संपूर्ण वाहिनीचा पुन्हा पेट्रोलिंग करून पूर्ण निवळी वाहिनी सुरू केली. व तालुक्यासाठी असणारी पर्यायी वाहिनी अखंडित विजपुरवठ्या साठी पूर्ववत केली. या संपूर्ण मोहिमेचे नियोजन आणि मार्गदर्शन सहाय्यक अभियंता अभियंता फारूक गवंडी, उपकार्यकारी अभियंता अंकुश कौरवार आणि कनिष्ठ अभियंता योगीनाथ गोरे यांनी केले होते. तसेच भावे इलेक्ट्रिकलचे सागर भावे यांनी आपल्या सर्व तांत्रिक कर्मचाऱ्यांसह मोलाची मदत केली.
या धाडसी कृती साठी व आरवली वाहिनी बंद पडलेनंतर सलग अठरा तास काम करून वीजपुरवठा सुरळीत केलेबाबत सर्व जनमित्र व अभियंत्यांचे वीज ग्राहकांच्या कडून अभिनंदन केले जात आहे. तसेच रत्नागिरीचे अधीक्षक अभियंता श्री सुनील माने व कार्यकारी अभियंता जितेंद्र फुल पगारे यांनी देखील संगमेश्वर टीमचे विशेष अभिनंदन केले

